नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची

आपत्ती कक्षाला भेट देत उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिल्या सतर्कतेच्या सूचना


ठाणे : राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यावर केले. शून्य जीवितहानी हे आपले लक्ष्य आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमीत वेळेत प्रतिसाद देऊन, यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून ठाणे महापालिकेने पावसाळ्यातील स्थितीचा चांगल्या पद्धतीने सामना केला आहे, असेही ते म्हणाले.


ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. तेथे मनुष्यबळ, वाहन, जेसीबीची उपलब्धता आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८ ठिकाणी उच्च क्षमतेचे ६६ पंप बसवण्यास आलेले आहेत. आतापर्यंत एकूण १३५ मिमी पाऊस झाला. पण पाणी साठण्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. जिथे थोडेफार होते तेही पंपांच्या मदतीने काढण्यात आले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाणे महापालिका क्षेत्रात, ६ ठिकाणी पर्जन्यमापक, ६ नाल्यांवर फ्लड सेंसर कार्यरत आहेत. ४३ संभाव्य ठिकाणी पाऊस पडत असताना कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, २९ जवानांचे टीडीआरएफ पथकही तैनात असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. सी वन गटातील अतिधोकादायक ९० इमारतींपैकी ४२ इमारती रिकाम्या आहेत. ६ इमारतीतून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले आहे. तसेच, १९७ कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून येणाऱ्या संदेशावर लक्ष ठेवावे. तसेच, असुरक्षित स्थळी आसरा घेऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामाची माहिती घेतली. त्याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, अनघा कदम आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे आहे.


मुंबई - ठाणे परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाधिकारी शिनगारे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास भेट दिली. यावेळी, त्यांनी महापालिकेचे सर्व उपायुक्त, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांची ऑनलाईन बैठक घेतली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामाचा आढावा घेतला. पहिलाच मोठा पाऊस असून नाल्यात साठणारा, डोंगर भागातून वाहून येणारा तरंगता कचरा तत्काळ काढण्यात यावा. तसेच, पाणी साठण्याच्या नेहमीच्या ठिकाणांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असे निर्देश या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. तसेच, नाले सफाईची कामे पूर्ण करणे, सी-वन गटातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करणे, आवश्यक ती रस्ते दुरुस्ती तत्काळ करणे आणि वृक्षांच्या धोकादायक फांद्यांच्या छाटणीचे काम जलद करणे या चार मुद्द्यांवर सगळ्यांनी अधिक लक्ष द्यावे. तसेच, नैसर्गिक आपत्ती ओढावली तर तत्काळ प्रतिसाद देणे, याला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीत दिले. ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना