
सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सला धड २० ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजानंतर गोलंदाजांनी चोख भूमिका पार पाडली आणि दणदणीत विजय मिळवला.
पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठ्या फरकाने मात करत आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवट विजयाने केला आहे. हैदराबादने केकेआरचा ११० धावांनी दारुण पराभव केला. हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी २७९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना १८.४ ओव्हरमध्ये १६८ धावांवरच गुंडाळलं. हैदराबादने यासह आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला.
हैदराबादच्या फलंदाजांची तूफान फटकेबाजी
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. अभिषेक १६ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. पण, त्याच्यानंतर हेनरिक क्लासेनने केकेआर संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेडने ४० चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. तर क्लासेनने १०९ धावांच्या खेळीत एकूण ७ चौकार आणि ९ षटकार मारले. असे करत क्लासेन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. हा उजव्या हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिला. याव्यतिरिक्त इशान किशनने २९ धावांचे योगदान दिले.
कोलकाताचे फलंदाज ठरले फेल
279 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सुनील नारायण, मनीष पांडे आणि हर्षित राणा या तिघांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. सुनील नारायण याने ३१, हर्षित राणा याने ३४ तर मनीष पांडे याने सर्वाधिक आणि ३७ धावा केल्या. दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले अर्थात भोपळाही फोडू शकले नाहीत. सनरायजर्स हैदराबादच्या जयदेव उनाडकट, एशान मलिंगा आणि हर्ष दुबे या त्रिकुटाने केकेआरचं पॅकअप केलं. या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.