भारताचा व्यापारविश्वातही जोरदार तडाखा

महेश देशपांडे

भारताने बांगलादेशमधून आयात होणाऱ्या ४२ टक्के वस्तूंवर बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशला अंदाजे ७७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) नुसार हे दोन्ही देशांच्या आयातीच्या सुमारे ४२ टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) निर्देशांनंतर जारी केलेल्या या बंदीमुळे भारत आता बांगलादेशमधून काही वस्तू कमी प्रमाणात आयात करेल. भारत सरकारने उचललेल्या या पावलामुळे आता बांगलादेशमधून फक्त तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्न आणि प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या वस्तू काही विशिष्ट बंदरांमधून भारतात येऊ शकतील. काही वस्तूंना भारतात पूर्णपणे प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशमधून दर वर्षी आयात होणारे सुमारे ६१८ दशलक्ष डॉलर किमतीचे तयार कपडे आता फक्त कोलकाता आणि न्हावाशेवा बंदरांमधूनच येऊ शकतील. पूर्वी हे कपडे जमिनीच्या मार्गानेही भारतात आणले जात होते. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या भारतातील कपड्यांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘जीटीआरआय’च्या अहवालात म्हटले आहे की, भारताने हे पाऊल अचानक उचललेले नाही. ते बांगलादेशने केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर आहे. बांगलादेशने २०२४ च्या अखेरीस अनेक भारतीय वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. एप्रिल २०२५ पासून रोड ट्रान्सपोर्टमार्गे भारतीय धाग्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. तांदळासारख्या अनेक वस्तूंच्या शिपमेंटशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री पाहून भारताने हे पाऊल उचलल्याचेही अहवालात म्हटले आहे. अलीकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. ते म्हणाले, ‘भारताच्या पूर्वेकडील सात राज्ये, ज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात, ते भूपरिवेष्टित आहेत आणि त्यांना समुद्रात प्रवेश नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी बांगलादेशचं समुद्राचा रक्षक आहे. इथे चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याची क्षमता आहे.’ या काळात दोन्ही देशांमध्ये २.१ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक आणि सहकार्य करारदेखील झाले. युनूस यांनी चीनमध्ये भारताबाबत केलेली विधाने आता त्यांना महागात पडली आहेत. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत गेली आहे. याला तोंड देण्यासाठी बांगलादेशने अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडे हात पुढे करत ७६२ दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच सुमारे ६३६० कोटी रुपयांची मदत मागितली आहे.

याच सुमारास आणखी एक दखलपात्र विदेश वृत्त समोर आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कस्तानने पाकिस्तानची मदत केली. एकीकडे भारत पाकिस्तानमधील दहशतवादाविरोधात लढत असताना तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला चिथावणी मिळेल असे कृत्य केले होते. त्यानंतर भारतीयांच्या मनात तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. भारतात ‘सोशल मीडिया’वर तुर्कस्तान आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये फिरायला जाणे आणि प्रवास करणे टाळावे, असे आवाहन सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सकडूनही केले जात आहे. ‘सोशल मीडिया’वर या ट्रेंडने इतका जोर धरला आहे की, आता त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी असलेल्या ‘मेक माय ट्रिप’ने म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या बुकिंगमध्ये तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. इतकेच नव्हे, तर फ्लाइट कॅन्सलेशन म्हणजे विमानांची तिकिटे रद्द होण्याचे प्रमाण २५० टक्क्यांनी वाढले आहे.

‘मेक माय ट्रिप’ या कंपनीकडून सध्या तुर्कस्तान आणि अझरबैजानसाठी फ्लाइट बुकिंग पूर्णपणे थांबवले गेले नसले तरी कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या देशाच्या आणि सैन्याच्या पाठीशी उभे आहोत. म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की, या वेळी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा. इतकेच नव्हे तर, या देशांसाठी सुरू असलेल्या सर्व जाहिराती आणि ऑफर्स थांबवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोकांना तिथे प्रवास करण्यापासून रोखता येईल. ‘इज माय ट्रिप’ या वेबसाइटवर तुर्कस्तानची २२ टक्के बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत तर अझरबैजानसाठी ३० टक्क्यांहून अधिक बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत. अलिकडेच ट्रॅव्हल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. या कंपन्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की गरज नसल्यास या देशांमध्ये प्रवास करणे टाळावे. असे असले, तरी सध्या कंपन्यांनी या देशांसाठीचे बुकिंग पूर्णपणे रद्द केलेले नाही. २०१४ मध्ये फक्त ४८५३ भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली होती. ही संख्या २०२४ मध्ये २.४३ लाखांपर्यंत वाढली. अझरबैजानच्या पर्यटनात पुढील दहा वर्षांमध्ये आणखी ११ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ‘सोशल मीडिया’वरील रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सकडून केले जाणारे प्रमोशन यामुळे पर्यटकांचा या देशांकडील ओघ वाढला आहे. दुसरीकडे २०१४ मध्ये १.१९ लाख भारतीय तुर्कस्तानला गेले होते. हीच संख्या २०२४ मध्ये ३.३० लाखांवर पोहोचली होती. भारत सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे, जिथे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्पादनक्षेत्रावर भर दिला जातो. दुसरीकडे, सरकार निर्यात वाढवण्यावरही वेगाने काम करत आहे. अशा परिस्थितीत आता सरकारच्या कष्टाचे फळ मिळताना दिसत आहे.

आता निर्यातीबाबत आलेल्या बातम्यांवरून जागतिक स्तरावर भारताची ताकद किती आहे याचा अंदाज लावता येतो. सरकारी आकडेवारीनुसार, सागरी उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा देश बनला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत आता सागरी उत्पादनांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार आहे. २०२५ मध्ये १३० देशांनी भारतीय सागरी उत्पादने आयात केली. २०१४-१५ मध्ये ती १०५ देशांमध्ये आयात होत होती. २०२४-२५ मध्ये भारताने १६.८५ लाख टन सागरी उत्पादने निर्यात केली, तर २०१४-१५ मध्ये ती १०.५१ लाख टन होती. मत्स्यपालन पद्धतींमध्ये प्रगती, सुधारित शीतसाखळी पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचे पालन यामुळे देशाची सागरी निर्यात २०१५ मधील ५.४ अब्ज डॉलर्सवरून २०२४-२५ मध्ये ७.२ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हा विस्तार भारतीय सागरी उत्पादनांची वाढती जागतिक मागणी आणि निर्यातदारांकडून उच्च-मूल्याच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचे प्रयत्न अधोरेखित करतो. निर्यातस्थळांच्या या विविधीकरणामुळे बाजारपेठेतील जोखीम कमी होते आणि दीर्घकालीन वाढीसाठी संधी उपलब्ध होतात.

२०१४-१५ मध्ये भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीत आठव्या स्थानावरून चार स्थानांनी सुधारणा झाली आहे. हे जागतिक बाजारपेठेत त्याची वाढती स्पर्धात्मकता आणि विश्वासार्हता दर्शवते. गेल्या दशकात भारताच्या सागरी निर्यातीत आकारमान आणि मूल्य या दोन्ही बाबतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक समुद्री खाद्यव्यापारात देश एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थापित झाला आहे. या कालावधीमध्ये ३.१५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीसह भारताने जागतिक सरासरी २.७ टक्के वाढीच्या दराला मागे टाकले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीफूड क्षेत्रात त्याचे वाढते स्थान आणखी मजबूत झाले आहे.
Comments
Add Comment

मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते.

सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी

पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेच्या विमानवहाक नौकेच्या दिशेने येत असलेले एक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहे. ही बातमी अमेरिकेच्या

भारतीय शेअर बाजार वधारला, बाजारात उत्साहाचे वातावरण

मुंबई : मुक्त व्यापार करारांच्या बाबतीत भारताची प्रगती उत्साहवर्धक आहे. युरोपियन युनियन सोबतच्या करारामुळे

ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६

महाराष्‍ट्र सरकारने प्रमुख राज्‍य सहयोगी म्‍हणून ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. हे समिट

किया इंडियाने जानेवारी २०२६ मध्ये विकल्या २७ हजार ६०३ कार

मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्‍मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची