
सिंध: पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर कालवा बांधण्याचा विचार करत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत, आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची मुलगी आणि खासदार आसिफा भुट्टो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफा कराचीहून नवाबशाहला जात होती. दरम्यान, निदर्शकांनी त्यांचा ताफा थांबवला आणि सिंधू नदीवरील वादग्रस्त कालवा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात घोषणाबाजी केली. काही लोकांनी ताफ्यातील वाहनांवर लाठी हल्ला केला. याच पाणी मुद्द्यावरून स्थानिकांनी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर देखील जाळले होते.
सरकार सिंधूचे पाणी चोलिस्तानला नेऊ इच्छिते
पाकिस्तानी वेबसाइट जिओ टीव्हीनुसार, सिंध नदीवर कालवे बांधून चोलिस्तानमधील हजारो एकर नापीक जमिनीवर लागवड करण्याची पाकिस्तान सरकार योजना आखत आहे. त्याची किंमत सुमारे 211 अब्ज पाकिस्तानी रुपये (63 अब्ज भारतीय रुपये इतकी आहे. मात्र, बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी याच्या विरोधात आहे. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे सिंधचे नुकसान होईल आणि त्यांचे पाणी काढून घेतले जाईल. काही आठवड्यांपूर्वी, सीसीआयने देखील हा प्रकल्प नाकारला होतं. त्यांनी म्हटले की सर्व राज्ये (प्रांत) यावर सहमत होईपर्यंत कोणताही नवीन कालवा बांधला जाणार नाही. असे असूनही, सिंधमध्ये निदर्शने सुरूच आहेत.
आसिफा भुट्टो पाकच्या पहिल्या महिला
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी गेल्या वर्षी त्यांची मुलगी आसिफा भुट्टो यांना पहिल्या महिलाचा दर्जा दिला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या मुलीचे नाव पहिल्या महिला म्हणून जाहीर केले. बेनझीर भुट्टो आणि आसिफ अली झरदारी यांच्या त्या कन्या असून, तीन भावंडांमध्ये आसिफा सर्वात लहान आहे. त्यांचे संपूर्ण शिक्षण ब्रिटनमध्ये झालं आहे. सामान्यतः राष्ट्रपतींच्या पत्नीला पहिल्या महिला असे म्हणतात. अनेकांना आसिफामध्ये तिच्या आई आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोची झलक दिसते.