Sunday, May 25, 2025

IPL 2025महत्वाची बातमी

MS Dhoni खरंच आयपीएल मधून संन्यास घेणार का? CSK च्या विजयानंतर म्हणाला, 'मी परत येणार की नाही...'

MS Dhoni खरंच आयपीएल मधून संन्यास घेणार का?  CSK च्या विजयानंतर म्हणाला, 'मी परत येणार की नाही...'

आयपीएलचे पुढील हंगाम खेळणार की नाही, याबद्दल स्पष्टच बोलला एमएस धोनी 


मुंबई: २०२५ च्या आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात एमएस धोनीने त्याच्या संघाचे चेन्नई सुपर किंग्जला (CSK) विजय मिळवून देऊन हंगामाचा शेवट गोड केला. पण याबरोबरच त्याच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते प्रश्न म्हणजे, हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होता का? धोनी पुढच्या वर्षीही परतेल का?


आयपीएलचा १८ वा हंगाम अंतिम टप्प्यात आहे आणि आता फक्त काही सामनेच शिल्लक आहेत. दरम्यान आयपीएलचा मोठा खेळाडू एमएस धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२५ चा हंगाम आता संपला आहे. रविवार, २५ मे रोजी, चेन्नईने आपला शेवटचा सामना खेळला आणि गुजरात टायटन्सवर शानदार विजय नोंदवला.  पण या विजयापेक्षाही, पुढील हंगामात एमएस धोनी परतणार का? हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे.



चेन्नई सुपर किंग्जकडून गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव


अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे CSK च्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला. या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएलच्या भावी हंगामांसाठी चेन्नई सुपर किंग्जचे भविष्य मानले जात आहे. पण या दरम्यान चाहत्यांना धोनीची फलंदाजी पाहण्याची संधी काही मिळाली नाही.



निवृत्तीबाबत धोनी काय म्हणाला? 


सामन्यानंतर झालेल्या सादरीकरण समारंभात, जेव्हा हर्ष भोगले यांनी धोनीला पुढील हंगामात खेळण्याबद्दल विचारले तेव्हा धोनीने त्याच्याच शैलीत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही किंवा कोणतेही आश्वासन देखील दिले नाही. धोनी म्हणाला, "माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. मी रांची येथील माझ्या घरी जाईन. मी बऱ्याच दिवसांपासून घरी गेलेलो नाही. मी परत येईन असे म्हणत नाही, तसेच मी परत येणार नाही असे देखील म्हणत नाही. मी इतक्या लवकर कोणताही निर्णय घेण्याची घाई करणार नाही, आणि तशी गरजही नाही."



IPLच्या इतिहासातील चेन्नईची सर्वात वाईट कामगिरी


धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम चांगला गेला नाही. संघाने हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दमदार विजयाने केली खरी, पण त्यानंतर त्याला उतरती कळा लागली. त्यानंतर आज गुजरात टायटन्सला हरवून हंगामाचा शेवट गोड केला. हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पण या दोन विजयांमध्ये, दोन्ही संघांची कामगिरी चांगली असली तरी, चेन्नईची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक होती. या दोन सामन्यांमधील उर्वरित १२ सामन्यांमध्ये चेन्नईने फक्त २ सामने जिंकले आणि १० सामने गमावले आहेत. परिणामी चेन्नईचा संघ फक्त ८ गुणांसह शेवटच्या स्थानावर राहिला. आयपीएलच्या १८ हंगामांच्या इतिहासात चेन्नईने हंगाम शेवटच्या स्थानावर संपवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Comments
Add Comment