Saturday, May 24, 2025

देशताज्या घडामोडी

Chemical Tanker Overturns: अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवेवर मोठा अपघात! हायड्रोजन पेरोक्साइडने भरलेला टँकर उलटला, केमिकल गळती

Chemical Tanker Overturns: अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवेवर मोठा अपघात! हायड्रोजन पेरोक्साइडने भरलेला टँकर उलटला, केमिकल गळती

 वडोदरा एक्सप्रेस वेवरील चकलासी पोलिस स्टेशन परिसरात दहेजहून अहमदाबादला जाणाऱ्या टँकरचा अपघात


अहमदाबाद: गुजरातच्या नडियादमधील अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला आहे.  येथे चकलासी पोलिस स्टेशन परिसरात, अहमदाबादला जाणारा एक टँकर  उलटला.  या टँकरमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड होते. टँकर उलटल्यामुळे त्यामधून हायड्रोजन पेरोक्साइडची गळती होऊ लागली. या घटनेची माहिती मिळताचा पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. अग्निशमन दल आणि एसडीआरएफ पथकांनी देखील तात्काळ उपस्थिती लावत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.


संबंधित प्रकरणाबद्दल डीएसपी बिमल बाजपेयी यांनी सांगितले की, "दहेजहून अहमदाबादला जाणारा टँकर अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवरील चकलासी पोलिस स्टेशन परिसरात उलटला. टँकरमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड होते. टँकरमधून हायड्रोजन पेरोक्साइड गळती झाल्यानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. अग्निशमन दल आणि एसडीआरएफ पथके उपस्थित आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही."


दरम्यान, आणंद शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी धर्मेश गौर यांनी सांगितले की, आम्हाला एक्सप्रेसवेवरून फोन आला की, आणंद शहरापासून पाच किमी अंतरावर एक टँकर उलटला आहे. आम्ही ताबडतोब अग्निशमन दलाची टीम पाठवली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइड पातळ करत आहोत. तसेच सदर घटनास्थळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.



काय आहे हायड्रोजन पेरोक्साइड?


हायड्रोजन पेरोक्साइड (Hydrogen Peroxide) हे एक रासायनिक संयुग आहे, ज्याचे रासायनिक सूत्र H₂O₂ असे आहे. याचा वापर कीटकनाशक आणि सॅनिटायझर म्हणून केला जातो. तसेच औद्योगिक वापरामध्ये कागद आणि कापड उद्योगात विरजनासाठी, तसेच रॉकेट इंधनात काही प्रकारात या रसायनाचा वापर होतो. हायड्रोजन पेरोक्साइड हे उपयोगी रसायन जारी असले तरी, त्याचा थेट आणि अयोग्य वापर गंभीर धोके निर्माण करू शकतात. हे रसायन थेट डोळ्यांमध्ये गेल्यास गंभीर इजा होऊ शकते. तसेच त्वचेच्या संपर्कात आल्यास जळजळ आणि चटके बसू शकतात.

Comments
Add Comment