
मागील काही दिवसांपासून मुकुल देव आजारी होता. आजारपणाबाबत त्याने कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नव्हती. पण आजारी असल्यामुळे मागील काही काळापासून मुकुल सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हता. यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण हे आजारपण असण्याची शक्यता आहे.
विंदू दारा सिंगने एक्स पोस्ट करुन मुकुल देवच्या निधनाची माहिती दिली. अभिनेत्री दीपशिका नागपाल हिने मुकुलच्या निधनाची बातमी ऐकून स्वतःच्याच कानांवर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली. अभिनेता मनोज वाजपेयी यानेही मुकुलच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसल्याचे सांगितले.
मुकुलचा जन्म नवी दिल्लीत १७ सप्टेंबर १९७० रोजी झाला. त्याने हिंदी, पंजाबी, तेलुगू, तामीळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात १९९६ मध्ये 'मुमकिन' या टीव्ही मालिकेतून झाली होती. त्याने सुष्मिता सेनसोबत 'दस्तक' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यमला पगला दीवाना, सन ऑफ सरदार, आर... राजकुमार आणि जय हो या चित्रपटांमध्ये तो दिसला होता.
दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमधून पदवीधर झालेल्या मुकुलने रायबरेली येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशनमधून वैमानिक अर्थात पायलट हा अभ्यासक्रम केला होता. नंतर चित्रपटसृष्टीत तो कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकला. मुकुलने २१ सरफरोश - सारागढी १८९७ मध्ये अभिनय केला होता.