
मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांची पाठराखण
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी गंभीर आरोप केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण केलीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण दिल्याची चर्चा सुरू झाली. या राजकीय खेळीमागे नेमकं काय आहे? फडणवीसांचा हा निर्णय महायुतीच्या भविष्यासाठी कसा ठरेल? जाणून घेऊया या लेखातून...
राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजतंय. त्यातच विरोधकांनी आवाज उठवल्याने राजकारण सुरू झालंय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हुंड्यासाठी त्रास आणि मारहाणीचा आरोप आहे. यात वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतलाय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. हगवणे यांच्या विवाहसोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा संबंध विरोधकांनी जोडला.
अजित पवारांनी स्वतः बारामतीत पत्रकार परिषदेत घेत आपण लग्नाला गेलो होतो, मात्र आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला. तरीही अजित पवारांचं नाव चर्चेत राहिलं. याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली. वैष्णवी मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई होईल आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं ठामपणे सांगितलं. तर अजित पवार या प्रकरणात गंभीर नाहीत असं नाही. कुणी लग्नाला बोलावलं तर जाणं चुकीचं नाही, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण करताना सांगितलंय.

महाराष्ट्रात कधी बरसणार ? उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. त्यातच यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने ...
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची बाजू घेऊन महायुतीतील अंतर्गत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महायुतीत एकजूट राखण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्व दिलंय. निवडणुकीचा विचार करता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागात मोठा प्रभाव आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवारांना दुखवणं परवडणारं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या घेतलेल्या बाजूचा फायदा भविष्यात भाजपाला मिळू शकतो. तर दुसरीकडे फडणवीसांनी कठोर कारवाईचं आश्वासन देऊन जनतेतही स्वत:ची प्रतिमा उंचावलीय.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं गेल्या काही वर्षांत राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचं राहिलंय. २०१९ पासून फडणवीसांनी अजित पवारांना अनेकदा राजकीय संकटातून बाहेर काढलंय. वैष्णवी हगवणे मृ्त्यू प्रकरणातही फडणवीसांनी पाठराखण करत अजित पवारांना पक्षांतर्गत आणि बाहेरच्या टीकेपासून वाचवलंय. त्यामुळे अजित पवारांवर फडणवीसांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची ही खेळी महायुतीचं नेतृत्व मजबूत करण्यात उपयुक्त ठरणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाने महायुतीतील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आणली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण करत एकीकडे महायुतीची एकजूट दाखवली, तर दुसरीकडे स्वतःची राजकीय रणनीती मजबूत केली. याचा फायदा २०२५ च्या निवडणुकीत कोणाला होईल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.