
पैशांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीचा मृतदेह औंध रुग्णालयात पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणण्यात आला होता. हे प्रकरण चिघळणार आणि अटक होणार याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी राजेंद्र आणि सुशीलला २३ मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या स्वारगेट परिसरातून झोपेतून उठवून पकडले होते. पकडल्यानंतर आज म्हणजेच शुक्रवार २३ मे रोजी दुपारी राजेंद्र आणि सुशीलला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. चौकशीसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली. कोर्टाने ही बाब विचारात घेतली आणि राजेंद्र आणि सुशीलला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाईपने मारहाण केल्याचे पोलीस तपासातून कळले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. मारहाणीचा प्रकार पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कलमवाढ केली आहे. ज्या पाईपने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप जप्त केल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले.
तपास सुरू आहे. चौकशीतून हाती येणाऱ्या माहितीआधारे पुढील तपास केला जाईल. आरोपींची मदत कोणी केली होती का ? याचाही तपास सुरू आहे. तपासातून हाती येणाऱ्या माहितीआधारे आरोपींविरोधात कलमवाढ होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. कस्पटे कुटुंबाने वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबाला दिलेली फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.