
मुंबई : गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, पवई तलावात येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बी.एन.एच. एस.)प्रतिनिधींनी नोंदविले आहे.
पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तरीही, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे.
एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले होते. आजमितीला पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही २ मशिनद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ ५ मशिन्स माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग देण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ६ मशिन्स तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर विनाविलंब विल्हेवाट लावली जाणार आहे.
पवई तलाव येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्याची दखल घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांच्यासमवेत संवाद साधण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिल्यानंतर आता त्यांच्याशी समन्वय साधूनच व त्यांच्या सल्ल्यानुसारच जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येणार आहे.