
मुरबाड तालुक्यातील वीट भट्टीवाल्यांचेही मोठे नुकसान
मुरबाड: मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्टा तसेच मुरबाड शहर परिसरात मागील दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने सर्वच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तालुक्यातील एकूण २७ घरांवरील छपरे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयात मिळाली आहे. याबाबतची माहिती मिळताच तसेच कार्याद्वारे तलाठी सर्कल मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली आहे.
पावसामुळे वीट भट्टी वाल्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या वीट भट्टीचा पंचनामा करण्याची मागणी वीट भट्टीचे मालक दीपक धुमाळ यांनी केली आहे.
पावसामुळे मुरबाड तालुक्यात उच्च दाब वाहिनीचे जवळपास १३ विजेचे खांब व २७ लघुदाब वाहिनीचे खांब कोसळले आहेत, तसेच मोठ मोठी झाडे पडल्यामुळे ५० ते ६० ठिकाणी तारा तुटून पडल्या आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील जवळपास २७००० ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झालेला होता. कर्मचारी व अधिकारी यांनी रात्री भर पावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन जवळपास २२००० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्रीच सुरळीत केला. सध्या पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी ७ कंत्राटदार, ६० कामगार, कर्मचारी व अधिकारी सतत कार्यरत असून उर्वरित ग्राहकाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. बदलापूर विभागाचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी ही माहिती दिली आहे.
ग्रामीण भागात जवळपास २०तास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यानंतर मुरबाड महावितरण कंपनीच्या टीमने सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात करून युद्धपातळीवर काम केले त्यावेळी सकाळी ११ वाजता विद्युत पुरवठा सुरू झाल्याची माहिती मुरबाड महावितरण कंपनीचे प्रभारी उपअभियंता राजेंद्र शिर्के यांनी दिली आहे.