
पनवेल महापालिकेच्या वतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर
पनवेल: पनवेल महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे प्रभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती अ- १८, प्रभाग समिती ब-१५, प्रभाग समिती क- १०, प्रभाग समिती ड-३७ अतंर्गत एकूण ८० सी-१ या प्रवर्गात मोडणाऱ्या मिळकती जाहिर करण्यात आलेल्या आहेत. सदर इमारतीतील रहिवाश्यांना त्यांच्या सदनिका रिक्त करण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९च्या कलम २६५ व २६८ नुसार, तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या अहवालानुसार, एकूण ८०धोकादायक इमारती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, अशा इमारतींतील नागरिकांनी तातडीने स्थलांतर करण्याबाबत महापालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी सूचना दिल्या आहेत. मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच राज्य शासनाने धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुळ मालक, भोगवटादार यांना पुरेशी संधी देऊनही संबंधितांनी इमारत रिक्त करुन पाडण्याची कार्यवाही केली नाही तर या इमारतीचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडीत करणे व त्यानुसार या इमारतींवर पोलीसांमार्फत निर्मनुष्य करुन पाडण्याची कार्यवाही मनपामार्फत करण्यात येत आहे. धोकादायक इमारत मालकांनी स्वतःहुन सुरक्षितरित्या पाडण्याची कार्यवाही करावी.
धोकादायक इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जिवीत व वित्त हानी झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या संबंधित नागरीकांची तसेच इमारतीचे मालक व भाडेकरु यांची राहील. त्याचप्रमाणे अतिधोकादायक मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याची जबाबदारी संबंधित घरमालक किंवा भोगवटादार यांची राहणार. याकरीता महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण माहिती www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच नागरिकांनी आपल्या आसपास धोकादायक इमारती असतील तर त्याची
माहिती नजिकच्या प्रभाग अधिकाऱ्यांना द्यावी.
जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये राहू नये व दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०००९ वर तसेच ०२२-७४५८०४०/४१/४२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले आहे.