Wednesday, May 21, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तानमध्ये पाण्यावरुन दंगल, सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांचे जाळले घर

पाकिस्तानमध्ये पाण्यावरुन दंगल, सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांचे जाळले घर
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पाण्यावरुन दंगली पेटण्यास सुरुवात झाली आहे. सिंध प्रांतात नागरिकांनी राज्याच्या गृहमंत्र्यांचे घर जाळले. बंगला जाळण्याआधी नागरिकांनी गृहमंत्र्यांचा घरातल्या अनेक वस्तू लुटल्या अथवा त्यांची तोडफोड केली.

पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. करार स्थगित झाला तरी मर्यादीत प्रमाणात नदीचे पाणी आजही पाकिस्तानला मिळत आहे. या उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे कारण देत पाकिस्तान सरकारने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा प्रकल्प तयार केला आहे. या कालव्यांमुळे सिंधू नदीतून मिळणारे जास्तीत जास्त पाणी पाकिस्तानमधील पंजाब प्रांताकडे वळवले जाणार आहे. पाकिस्तान सरकार करत असलेल्या या भेदभावामुळे सिंध प्रांतातील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

सिंध प्रांताच्या सरकारने विरोध केला नाही म्हणून पाकिस्तान सरकारने पंजाबच्या हितांचे रक्षण करणारा कालवा प्रकल्प तयार केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. सिंध प्रांतात सिंधचे सरकार आणि पाकिस्तान सरकार विरोधात निषेधाचे मोर्चे निघू लागले आहेत. अनेकांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांचे नौशहरो फिरोज जिल्ह्यातील घर जाळले. जाळण्याआधी नागरिकांनी गृहमंत्र्यांचा घरातल्या अनेक वस्तू लुटल्या अथवा त्यांची तोडफोड केली. घराबाहेर पार्क केलेली सर्व वाहने नागरिकांनी जाळली.

पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर सहा कालवे बांधून उपलब्ध पाणीसाठ्यातील जास्तीत जास्त साठा पंजाब प्रांताकडे वळवणार आहे. या कालव्यांद्वारे चोलिस्तानमधील सिंचन व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान सरकारच्या या योजनेवरुन पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ गट हे दोन राष्ट्रीय पक्ष आमनेसामने आहेत. सिंध प्रांतातील इतर राजकीय पक्षांनीही पाकिस्तान सरकारच्या कालव्यांच्या योजनेला विरोध केला आहे.
Comments
Add Comment