Wednesday, May 21, 2025

ठाणे

मीरा-भाईंदरची नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होणार

मीरा-भाईंदरची नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होणार

भाईंदर :पाऊस अति पडला तरी किंवा अजिबात पडला नाही तरी नुकसान करतो. त्यामुळे पावसाळा म्हटला की सामान्य नागरिकांच्या पोटात गोळाच येतो. आधीच्या वर्षाच्या अनुभवावरून शाहणे होऊन पुढील वर्षीचा त्रास टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. त्यातील महत्त्वाचे काम असते नालेसफाईचे. पावसाळयात शहरात पाणी साचू नये यासाठी नालेसफाई योग्य पद्धतीने व वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनाने एप्रिलपासून सुरू केलेले काम जवळजवळ ६५ टक्के पूर्ण झाले असून ३१ मे पूर्वी ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पालिकेने शहरातील १५५ नाले सफाईसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली असून शहरातील ४५ सखल भागांसाठी सक्शन पंप तैनात केले आहेत.


मीरा-भाईंदर शहरात लहान मोठे १५५ नाले आहेत. त्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ, वेस्टर्न पार्क, पंजाब फौंड्री, मुंशी कंपाऊंड, लक्ष्मी पार्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महापालिकेने २० एप्रिलपासून नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई करण्यास सुरुवात केली होती. कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम सफाई कामगार पोकलन, बोट पोकलन, जेसीबी, डंपर इत्यादी साहित्यासह करत आहेत. अतीवृष्टी झाल्यावर शहरातील सखल भागात पाणी भरत असते. त्यासाठी प्रशासनाने ४५ सक्शन पंप तैनात केलेले आहेत.

Comments
Add Comment