Wednesday, May 21, 2025

विशेष लेख

विज्ञानाचा वाटाड्या ते साहित्याचा वारकरी

विज्ञानाचा वाटाड्या ते साहित्याचा वारकरी

डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य भारतासाठी महत्चाचे होतेच; परंतु जागतिक पातळीवर खगोल शास्त्रात त्यांनी ठसा उमटविला होता. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोल शास्त्रात मारलेली झेप निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती. राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केले होते.


पुण्यात 'आंतरविश्व विद्यापीठ' स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांचे निधन हे राज्यासाठी नव्हे, तर देशासाठीही मोठी हानी आहे.डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली.


उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली. डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. मुलांमध्ये विज्ञान रुजावे. त्यांची विज्ञानाची कक्षा रुंदावी यासाठी त्यांची खास तळमळ होती. विज्ञान किचकट नाही, तर सुलभ भाषेतून शिकवण्यासाठी ते साहित्याच्या पंढरीत रमले. घरातूनच त्यांना विज्ञानाचे बाळकडू मिळाले होते.


जयंत नारळीकर यांना पूर्वीपासूनच अंतरिक्ष, अंतराळाची ओढ होती. खगोलविज्ञानात त्यांचा पूर्वीपासून ओढा होता. त्यातूनच त्यांनी आकाशाशी नाते जोडले. पण विज्ञानातील या घडामोडी बालगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला. विज्ञान किचकट नाही, तर सोपं असल्याचे त्यांनी समोर आणले. त्यांनी लेखणीतून महाराष्ट्राला विज्ञान साक्षर करण्यासाठी लेखणी झिजवली. त्यांनी विज्ञान साहित्यविश्वाचे नवे दालन सर्वांसाठी उघडलेच नाही, तर ते समृद्ध केले.


पाश्चात्य देशातील लोकांमध्ये जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसा आपल्याकडील लोकांचा असावा ही त्यांची प्रांजळ भावना होती. लोकांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून जागरुकता यावी आणि त्यांच्यात विज्ञानाची आवड असावी हा त्यांचा लिखाणाचा हेतू होता.


१९७९ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा यक्षांची देणगी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याने विज्ञान साहित्याच्या चौकटी बदलल्या. हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. विज्ञान कथा लिहिताना त्यांनी ती बोजड, तांत्रिक अथवा कंटाळवाणी वळण टाळले. उलट त्यात साहित्य विनोदाची पेरणी केली. त्यामुळे एक मोठा वर्ग विज्ञानाकडे वळाला. त्यांच्या या पुस्तकांची मराठी तरुणाईलाच नाही, तर अबालवृद्धांना भुरळ घातली नसती तर नवल.


नारळीकरांसारखा प्रख्यात वैज्ञानिक लिखाण करतो, ही मराठी वाचकांसाठी साहित्य मेजवाणीच ठरली. मराठी साहित्याला या विज्ञान कथांनी नवी उभारी आणि भरारीच दिली असे नाही, तर महाराष्ट्राचा विज्ञानवादी दृष्टिकोन भक्कम होण्याचा पाया यामधून घातला गेला.


डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा


अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.


मराठीतील पुस्तके :




  • अंतराळातील भस्मासूर

  • अंतराळातील स्फोट

  • अभयारण्य

  • चला जाऊ अवकाश सफरीला

  • टाइम मशीनची किमया

  • प्रेषित

  • यक्षांची देणगी

  • याला जीवन ऐसे नाव

  • वामन परत न आला

  • व्हायरस

  • अंतराळ आणि विज्ञान

  • आकाशाशी जडले नाते

  • गणितातील गमतीजमती

  • नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)

  • नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान

  • Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)

  • विज्ञान आणि वैज्ञानिक

  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे

  • विज्ञानाची गरुडझेप

  • विज्ञानाचे रचयिते


जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार आणि मानाची पदं




  • १९६५ मध्ये पद्मभूषण पुरस्कार

  • २००४ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार

  • २०१० मध्ये महाराष्ट्र


भूषण पुरस्कार




  • भटनागर पुरस्कार

  • एम. पी. बिर्ला पुरस्कार

  • २०१२ मध्ये अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार

  • २०१४ मध्ये डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार

  • २०१४ सालचा ‘चार

  • नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार

  •  ’यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार

  • फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार

  • २०२१ मध्ये नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद


द बिग बँग थिअरी नाकारणारे नारळीकर


१९८८ मध्ये, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुण्यात आंतर-विद्यापीठ अंतराळ विज्ञान केंद्राची स्थापना केली. नारळीकर केंद्राचे संस्थापक-संचालक होते. तेव्हा त्यांनी स्टेडी स्टेट कॉस्मोलॉजीचे समर्थन केले आणि ‘द बिग बँग’ सिद्धांत नाकारला होता.


लोकप्रिय मराठी विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांना विज्ञानाची आवड होती पण ते समजून घेणे नेहमीच कठीण वाटायचे,” असा एक अनुभव प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी मुलाखतीतून सांगितला होता.


विज्ञान साहित्याचे पूजक


शास्त्रीय बैठकीसह त्यांनी साहित्य विश्वात विज्ञानाची पणती तेवत ठेवली. विज्ञानाची गोळी कडू लागत असेल, तर तिला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुप देणे योग्य ठरेल असे त्यांचे मत होते. त्यांनी विज्ञानकथा लिहिण्यामागील त्यांचा हेतू स्पष्ट केला होता. त्यांच्या कथेचे शीर्षकच अगदी मनातील कुतूहल चाळवणारे ठरत असे. तितक्याच या कथा सोप्या आणि खोल अर्थ समजावून सांगत.


नारळीकरांनी यक्षांची देणगी, कृष्णविवर, उजव्या सोंडेचा गणपती, गंगाधरपंतांचे पानिपत, धूमकेतू, पुनरागमन, दृष्टीआड सृष्टी, धोंडू, पुत्रवती भव, ट्रॉयचा घोडा, नौलखा हाराचे प्रकरण, अखेरचा पर्याय अशा भुरळ घालणाऱ्या विज्ञान कथा लिहिल्या. त्यांचे गारूड एका पिढीवरच नाही, तर कित्येक पिढ्यांवर राहील यात शंका नाही.


नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयुकामध्ये जाऊन परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते केला. प्रथेप्रमाणे तो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात येतो, पण कोरोनाचे संकट असल्याने जाहीर सत्कार न घेता तो आयुकामध्ये सहा लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला.


विज्ञानप्रसार कार्य


मराठी व इंग्रजीतील व्याख्याने, लेख आणि रेडिओ/टीव्ही प्रोग्राम्सद्वारे विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही विज्ञानजागर मोहिमेत सक्रीय सहभाग. डॉ. नारळीकर हे बिग बँग सिद्धांताला पर्यायी कल्पनांचे समर्थक होते. त्यांनी गुरुत्व, क्वांटम कॉसमॉलॉजी, ब्लॅक होल्स, क्वासार्स यांसारख्या अनेक विषयांवर संशोधन केले. विज्ञानप्रसारासाठी त्यांचे लेखनही खूप प्रसिद्ध होते.


Comments
Add Comment