
हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक झाली आणि त्यानंतर तपास यंत्रणांच्या तपासाची दिशाच बदलली. ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या दोन आठवड्यात एक - दोन नव्हे तर चक्क बारा हेरांना अटक झालीय. ट्रॅव्हल ब्लॉगिंगच्या नावाखाली हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राचे कारनामे उघड झाले. तसेच कारनामे या बारा घरभेदींचेही उघड झाले. यात पाच पंजाब, सहा हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशातील आहे. माहिती देण्याच्या बदल्यात त्यांना पाकिस्तानातून लाखो रुपये मिळाले आहेत, अशी माहिती समोर आलीय. हरियाणातल्या नूंहमध्ये हेर मोहंमद तारीफला बेड्या ठोकण्यात आल्या. आपण अनेकदा पाकिस्तानला गेल्याचे आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे तारीफने एका व्हिडीओद्वारे कबूल केले आहे. एका अधिकाऱ्याने दोन सिमकार्डच्या बदल्यात त्याला व्हिसा दिला. लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्याला सिरसा एअरबेसचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातून हेर शाहजाद याला अटक करण्यात आली. हा शाहजाद व्यापारी आहे. व्यापाराच्या नावाखाली हा पाकिस्तानात जाऊन आलाय. व्यवसायाच्या नावाखाली आयएसआयसाठी सीक्रेट मिशन राबवत होता. आयएसआयकडून भारतात राबवण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झालंय.
पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मदला अटक करण्यात आलीय. हे दोघेही हर नवी दिल्लीतल्या पाकिस्तान वकिलात काम करणाऱ्या दानिश यांच्या संपर्कात होते. दानिश, गजाला आणि यामीन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झालंय. तर हरियाणातून नोमान इलाहीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना काही संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. तर हरिणातला दुसरा हेर देविंदर सिंह ढिल्लोला अटक करण्यात आलीय. याच्यावर ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानाला माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसंच आयएसआयच्या संपर्कात असल्याचंही उघड झालंय.
नूंहमधून अरमान या हेराला अटक केलीय. व्हॉटस्अॅपवरून महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा याच्यावर आरोप आहे. तर दुसरीकडे युट्यूबर प्रियंका सेनापतीची चौकशी सुरू आहे. ज्योती मल्होत्रा प्रियंकाला भेटण्यासाठी पुरीमध्ये गेली होती. ज्योतीला तिने मदत केली का, याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. तर युट्यूबर नवांकर चौधरीवरही हेरगिरी केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहे. सध्या नवांकरने हे आरोप फेटाळले आहेत. अजून एक हेर मोहम्मद मुर्तजा अलीच्या मुसक्या आवळ्यात आल्या आहेत. गुजरात पोलिसांनी मोहम्मद अलीला जालंदरमधून अटक केलीय. आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. ज्योती मल्होत्रा हे हिमनगाचे टोक असल्यासारखं आहे. देशात अजून असे अनेक गद्दार हेरगिर असू शकतात. त्यांना वेळीच वेसन घालावं लागणार आहे. तपास यंत्रणांनी बारा जणांच्या मुसक्या आवळल्या तरी अशा अनेक हेरगिरांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आलीय.