Sunday, May 18, 2025

कोलाज

डॉ. कोटणीस की अमर कहानी

डॉ. कोटणीस की अमर कहानी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


१० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म झाला. डॉ. कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ. कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून, अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा. कृ. पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली, असे आज अभिमानाने सांगितले जाते.


वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले; मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर रोडलगतच असलेले ‘कोटणीस हाऊस’ हे डॉ. कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ‘काँग्रेस हाऊस’ म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या ‘कोटणीस हाऊस’मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.


डॉ. कोटणीस यांच्या पत्नी डॉ. को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरीत्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैन्यावस्था पाहून त्या व्यथित होत. ही अवस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश (चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ. कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.


चीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की, तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो... मुंबईच्या कोटणीस कुटुंबाची. कोण होते डॉ. कोटणीस, ज्यांना चीनमध्ये इतका मान दिला जातो? दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरने आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचे नाव. जपान आणि चीनमधले युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती. त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने भारतीय वैद्यक मिशनने एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटणीस हे एक होते. ते आपले काम अतिशय मन लावून करत असत. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचले. युद्धभूमीवर प्लेगची भीषण लागण झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डॉक्टर लोक घाबरत असत पण कोटणीस कधी घाबरले नाहीत.


त्यांनी किमान ८०० जणांवर उपचार केले असावेत असे म्हणतात. तिथल्या भीषण परिस्थितीमुळे त्यांच्यासोबत भारतातून आलेले डॉक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्या या समर्पण भावामुळेच त्यांचा चीनमध्ये आदर केला जातो.


वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डॉ. कोटणीस यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं. ''सैन्याने एक चांगला सहकारी आणि देशाने एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया,” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते.
चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतिरूपाने जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश, जाती, धर्म या बंधनांच्या पलीकडे जाऊन मानवतेची खऱ्या अर्थाने पूजा केली असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.


भारतात मात्र त्यांची आठवण कुणी फारशी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डॉ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता. चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीनने त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट छापले आहे. हंबे या भागात त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या शतकातील ‘चीनचे सर्वांत जवळचे परदेशी मित्र’ असे सर्व्हेक्षण २००९ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आले होते. या यादीमध्ये नाव डॉ. कोटणीस यांचेही नाव होते. डॉक्टरांचा आजही चीनमध्ये खूप आदर केला जातो असं चायना डेली या वृत्तपत्राने म्हटले आहे. डॉ. कोटणीस यांच्या लोकप्रियतेचे कारण काय आणि १९५० सालापासून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना चीनचे नेते का भेट देतात?”१९६२ साली भारत आणि चीनचे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरुद्ध आणि वसाहतवादाविरुद्ध लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे,” असं चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांचं म्हणणं आहे.


डॉ. कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून, अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डॉ. कोटणीस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Comments
Add Comment