मराठी भाषा गौरव दिन (स्टुटगार्ट - जर्मनी)

  48

फिरता फिरता : मेघना साने


मराठी माणूस कोणत्याही देशात गेला आणि तेथील देशातील वातावरणाशी मिळते जुळते घेऊन राहायला लागला तरी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरणे त्याला जरुरीचे वाटते. जर्मनीत स्थायिक झालेली मराठी माणसे देखील एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन सण, उत्सव एकत्र साजरे करू लागली. यातूनच २०१४ मध्ये जर्मनीत ‘मराठी मित्र मंडळ’ नावाचे पहिले मराठी मंडळ स्थापन झाले.


या पहिल्या मंडळाच्या स्थापनेनंतर स्फूर्ती घेऊन जर्मनीतील इतर प्रांतात मिळून ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’, ‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक, बर्लिन मराठी मंडळ’, ‘हॅम्बुर्ग मराठी मंडळ’, ‘महाराष्ट्र मंडळ, स्टुटगार्ट’ ई. अकरा मराठी मंडळे स्थापन झाली आहेत. प्रत्येक मंडळात ५० ते १५० सभासद आहेत. सर्व मंडळे आपापल्या परीने मराठी भाषिकांना एकत्र आणून सर्व मराठी सण आणि मराठी भाषा दिन साजरा करतात. अशा तऱ्हेने मराठी संस्कृतीचे जर्मनीत जतन होत आहे.


‘महाराष्ट्र मंडळ, स्टुटगार्ट’ यांनी वर्षभरासाठी मराठीचे कार्यक्रम आखलेले असतात. गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी आणि मराठी भाषा दिन हे उत्साहात साजरे केले जातात. तसेच मराठी जनांसाठी भारतातून कलाकार बोलावून सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. कधी कधी मराठी चित्रपटही दाखवला जातो. ऑक्टोबर २०२३ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचा जर्मनीतील मराठी लोकांनाही खूप आनंद झाला. ती त्यांचीही मायबोली आहे. याच आनंदात यंदा १५ मार्च २०२५ रोजी, स्टुटगार्ट, जर्मनी येथील महाराष्ट्र मंडळाने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. हा दिवस मराठी भाषेची महती आणि तिच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी समर्पित होता.


कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीमध्ये फुलांनी सजवलेली मराठी ग्रंथ पालखी, लेझीम नृत्य करणारी मुले, हातात उंचावलेला मराठीचा झेंडा असा पारंपरिक आणि उत्साह वाढवणारा नजारा होता. या दिंडीत साहित्यिकांच्या प्रतिमा, घोषवाक्य पाट्या आणि गौरव घोषणाच्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून अधिवक्ता शिल्पा गडमडे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने जर्मनी आणि युरोपमध्ये मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, महाराष्ट्र मंडळ स्टुटगार्टने त्यांच्या ग्रंथालय प्रकल्पाच्या सुरुवातीची घोषणा केली. गडमडे यांनी ग्रंथालयासाठी तसेच पुढच्या पिढीमध्ये मराठी भाषेचे संगोपन करण्यासाठीच्या उपक्रमांसाठी मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.कार्यक्रमाच्या पुढील भागात मराठी भाषेच्या महत्त्वावर आधारित नाट्यछटा सादर करण्यात आली. थोर मराठी कवींच्या कविता वाचनासोबतच, लावणी, गोंधळ आणि इतर पारंपरिक लोकनृत्यांचं सादरीकरण करण्यात आले. हे सगळे पाहून मराठी संस्कृतीचा अभिमान जागा झाला. कार्यक्रमात मराठी रंगभूमीवरील नाट्यप्रवेश देखील होते. “वऱ्हाड निघालंय लंडनला”, “शांतता! कोर्ट चालू आहे”, आणि “रायगडला जेव्हा जाग येते” या नाट्यप्रवेशांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि अंगावर रोमांच उभे राहिले. मराठी संगीतात लोकसंगीत, वाद्यसंगीत सादर केले गेले.


जर्मन माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी मराठी भाषेत मराठी सण, महाराष्ट्रीय पाककृती आणि शिवजयंती यासारख्या विविध विषयांवर भाषणे केली, त्यांच्या भाषणांमुळे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष पटली. संगीत कार्यक्रमाचा समारोप “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या गीताने झाला. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशी सुरुवात करत परदेशात राहून महाराष्ट्रीय जेवणाची पंगत हा आगळावेगळा अनुभव घेण्याची संधी मिळाली. पुरी, भाजी अणि श्रीखंडाचा बेत त्याबरोबरच मित्र मैत्रिणींनी घेतलेल्या विविध उखाण्यांनी पंगतीचा आनंद द्विगुणित झाला. हा संपूर्ण कार्यक्रम केवळ मराठी भाषेचा गौरव नव्हता, तर परदेशात मराठी संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत ती पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. मराठी भाषेच्या अमुल्य वारशाचे आणि तिच्या संस्कृतीचे जपणूक करण्याचा हा महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम होता. मराठी मंडळांचे सांस्कृतिक आदानप्रदान प्रभावीपणे सुरू असताना नव्या पिढीला माय मराठीशी जोडून घेण्याची गरज भासू लागली. इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी इंग्रजी अथवा जर्मन भाषेत शिकत होते. साहजिकच त्यांची मराठीची नाळ तुटत चालली होती. भारतातील आपल्या नातलगांशी त्यांचा नीट संवाद व्हावा यासाठी जर्मनीमध्ये काही महाराष्ट्र मंडळांनी मराठी शाळादेखील सुरू केल्या आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी मराठी भाषा लिहायला व वाचायला शिकविले जाते. जर्मनीतील मराठी मंडळे व त्यांचे उपक्रम, तेथे चालविल्या गेलेल्या मराठी शाळा तेथील मराठी जनांचे मराठी भाषेवरील व संस्कृतीवरील प्रेम आणि निष्ठाच अधोरेखित करते. आपापल्या नोकरी / व्यवसायाचे अवधान सांभाळून ही मंडळी मराठीची रोपे लावणे व त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करीत असतात हे खरंच कौतुकास्पद आहे.

Comments
Add Comment

शुभाशीर्वाद अवकाशाचे...

मनभावन : आसावरी जोशी अवकाश म्हणजे एक निर्वात पोकळी... लहानपणापासून भूगोलाच्या तासाला घोकून पाठ केलेली माहिती.

लुप्त झालेला नाट्य खजिना : भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद सध्या राजकीय वारे शिक्षणाच्या दिशेने वाहणाऱ्या हिंदी भाषेच्या झग्यात शिरलेत.

कलावंताला जेव्हा ‘डॉक्टराश्रय’ मिळतो...

राजरंग : राज चिंचणकर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे हे रंगभूमीवर ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे नाट्य सादर करत असतात.

अभिनयासोबत निर्मिती देखील

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  नूतन जयंत या अभिनेत्रीने अभिनयासोबत निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे.

प्रत्येक प्रेक्षकाने पडताळून पाहावी अशी “भूमिका”

पाचवा वेद : भालचंद्र कुबल  आज ज्या दिवशी मी ‘भूमिका’ या नाटकाचं निरीक्षण लिहितोय त्याचवेळी सध्या आणखी चार मराठी

काळी जादू...

मनभावन : आसावरी जोशी जादू... या दोन अक्षरांचे आपल्यासारख्या सामान्यांना प्रचंड आकर्षण.. अशक्यप्राय गोष्ट घडणे