
चंद्रपुर : एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची किंवा प्रियकराची हत्या, आत्महत्या या घटना रोजच वाचतो, पाहतो. रोजचंच घडलंय म्हणून आपण दुर्लक्ष करतो, मात्र या घटना आता वन्यप्राण्यांमध्ये देखिल घडायला लागल्या आहेत. हो, एका छोटा मटका नावाच्या वाघानं आपल्या प्रेयसीसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी एक नव्हे, तर चक्क तीन वाघांचा काटा काढलाय. बसला ना धक्का. तर चला पाहूयात हा छोटा मटका अर्थात ताडोबातील वाघ आणि त्याची प्रेमकहाणी...
चंद्रपुरातील ताडोबा जंगल हे पर्यटकांचं फेव्हरेट ठिकाण, मात्र याच ताडोबामध्ये छोटा मटकाची मोठी दहशत आहे. आता तुम्ही म्हणाल काय झालं? सांगतो, छोटा मटका हे ताडोबातल्या एका वाघाचं नाव. या छोटा मटकाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा चक्क काटा काढलाय. नयनतारा असं छोटा मटका या वाघाच्या प्रेयसीचं नाव. या नयनतारासाठी छोटा मटका काहीही करायला तयार, तोही एका पंजावर. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला छोटा मटका यानं यमसदनी पाठवलंय.
छोटा मटका आणि तरुण असलेल्या ब्रह्मा या दोन वाघांमध्ये ब्रह्मपुरी क्षेत्रात चुरशीची झुंज झाली. या चुरशीच्या झुंजीत छोटा मटकानं ब्रह्मा या वाघाचा फडशा पाडला. आपल्या अधिवासात आणि प्रेयसी नयनतारासाठी छोटा मटकानं प्राण पणाला लावले. ब्रह्मा या वाघाशी झुंज होण्यापूर्वी छोटा मटकाची बजरंग या वाघाशी मोठी झुंज झाली. या झुंजीतही छोटा मटकानं मोठा पराक्रम करत बजरंग या वाघाला ठार केलं. अशाचप्रकारे त्यानं मोगली या वाघाचाही फडशा पाडला.
छोटा मटकाने आतापर्यंत तब्बल तीन वाघांना यमसदनी पाठवलंय. त्यात पहिली झुंज ही शिकारीसाठी होती, दुसरी झुंज ही त्याच्या अस्तित्वासाठी होती तर तिसरी झुंज ही त्याची लाडकी प्रेयसी असलेल्या नयनतारासाठी होती. प्राण्यांच्या जगातही प्रेमासाठी प्राण देण्याची आणि प्राण घेण्याची वृत्ती दिसून आली. प्रेयसीसाठी तुल्यबल असा तीन नर वाघांना छोटा मटकानं संपवलंय आणि स्वत:चं अस्तित्व निर्माण केलंय.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढतेय. त्यामुळे अधिवास क्षेत्राला मर्यादा येतायेत. वाघांची संख्या वाढतेय ही चांगलीच बाब आहे, मात्र ताडोबामध्ये अधिवास आणि मादींसाठी वाघांमध्ये संघर्ष निर्माण होतोय. या संघर्षात जो जिंकतो तो राजा ठरतो. छोटा मटकानेही तीन-तीन नर वाघांचा फडशा पाडून आपलं राजेपण सिद्ध केलंय, इतकंच नव्हे तर लाडकी प्रेयसी नयनताराकडे वाकड्या नजरेनं पाहिलंत तर जीवच घेईन, असा इशाराही दिलाय.