Friday, May 23, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

ऑपरेशन सिंदूर सुरू आहे... हवाई दलाच्या एक्स पोस्टने चर्चेला उधाण

ऑपरेशन सिंदूर सुरू आहे... हवाई दलाच्या एक्स पोस्टने चर्चेला उधाण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक सुरू आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीसाठी सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख त्यांच्या अधिकृत गणवेशात आले आहेत. भारत - पाकिस्तान तणाव, सध्याची स्थिती आदी देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयांवर बैठकीत चर्चा सुरू आहे. ही बैठक सुरू होण्याआधी हवाई दलाने एक एक्स पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे असे स्पष्ट शब्दात नमूद आहे. ही पोस्ट आल्यापासून चर्चेला उधाण आले आहे.






काय आहे भारतीय हवाई दलाची एक्स पोस्ट ?


भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेसह यशस्वीरित्या पार पाडली आहेत. ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत, जाणीवपूर्वक आणि सावधगिरीने पार पाडण्यात आली. ऑपरेशन (ऑपरेशन सिंदूर) अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. भारतीय हवाई दल सर्वांना अटकळ (अंदाज व्यक्त करणारी माहिती) आणि असत्यापित (Unverified Information) माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करते.



चर्चेला उधाण


पाकिस्तानच्या डीजीएमओने फोन करुन भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. याला उत्तर देताना पाकिस्तानने हल्ला केला नाही तर भारत प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही; अशा स्वरुपाचे उत्तर भारताच्या डीजीएमओने फोनवरुन दिले. यानंतर पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताने स्वीकारला. पण शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या पाकिस्ताननेच अवघ्या काही तासांत नव्याने भारतावर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावल्यानंतर भारताने पाकिस्तानला स्वतःच्या सामर्थ्याची झलक दाखवून दिली. भारताने दणका देताच पाकिस्तानने भारतावर हल्ले करणे थांबवले. यानंतर पुढचे काही तास झाले भारत - पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची एक एक्स पोस्ट चर्चेत आहे. हवाई दलाने या पोस्टद्वारे ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही तर सुरू आहे, असे सांगितले आहे. यामुळे भविष्यात पुन्हा पाकिस्तानने आगळीक केल्यास भारत त्वरेने त्याला उत्तर देण्याची शक्यता आहे.



भारताचे नवे धोरण


भारताच्या नव्या संरक्षण विषयक धोरणानुसार देशात कुठेही अतिरेकी हल्ला झाला तर तो हल्ला करणाऱ्यांच्या मागे उभ्या असलेल्या देशाने भारतावर आक्रमण केले असे समजले जाईल आणि संबंधित देशाविरोधात लष्करी कारवाई करण्यास भारत स्वतंत्र असेल. हे धोरण जाहीर करुन २४ तासही उलटले नाहीत तोच भारताच्या हवाई दलाची ऑपशन सिंदूर अजून सुरू आहे, अशी एक्स पोस्ट आली. यामुळे भारता - पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष संपणार की नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Comments
Add Comment