Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

शेपूट वाकडी ती वाकडीच! अवघ्या ३ तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

शेपूट वाकडी ती वाकडीच! अवघ्या ३ तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३.३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांनी भारतीय लष्करी महासंचालकांना संपर्क साधला आणि शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यापासून युद्धजन्य कारवाया थांबवण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. अखेर आज सायंकाळी ५.३० वाजल्यापासून पूर्णविराम मिळाला असे वाटत असतानाच रात्री ८:३० वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू मधील सीमा भागात हल्ला करण्यात आला.


अखनूरसह जम्मू आणि काश्मीरच्या विविध क्षेत्रांमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जाते की, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, अगदी तशीच परिस्थिती शेजारच्या देशाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.


७ मे रोजी भारताच्या निर्णायक एअर स्ट्राईकनंतर उफाळून आलेल्या युद्धजन्य परिस्थितीला आज अखेर शस्त्रसंधीच्या निर्णयाने विराम मिळतो, असे वाटत असतानाच पाकिस्तानने पुन्हा विश्वासघात केला आहे. संध्याकाळी ५ वाजता भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती, परंतु रात्री ८.३० वाजता पाकिस्तानकडून जम्मूच्या सीमावर्ती भागात पुन्हा गोळीबार करून शस्त्रसंधीचे उघड उल्लंघन करण्यात आले.


जम्मूतील अखनूर, नौशेरा आणि राजौरी जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, काही ठिकाणी भारतीय लष्कराने प्रतिउत्तरही दिले आहे.


दुपारी ३.३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांनी (DGMO) भारतीय DGMO शी संपर्क साधत युद्धविरामाचे सूतोवाच केले. भारताने संयम आणि शांततेचा मार्ग स्वीकारत सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे जाहीर केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील ट्विटरवरून शस्त्रसंधीची माहिती दिली आणि स्पष्ट केलं की, "दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका आजही तितकीच कठोर आणि ठाम आहे."


पण पाकिस्तानने केवळ ३ तासांतच हा शांततेचा समझोता तोडून पुन्हा एकदा आपला अविश्वासार्ह चेहरा जगासमोर उघड केला आहे. "पाकिस्तानची फितुरी हीच त्यांची सवय आहे. शांततेचा हात पुढे करून पाठीत वार करणं हीच त्यांची परंपरा," अशी प्रतिक्रिया संरक्षण क्षेत्रातील सूत्रांकडून देण्यात आली.


दरम्यान, भारतीय लष्कराकडून पाकला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, "शांती जपण्याचा निर्णय घेतला असला, तरी भारतावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर अधिक तीव्र आणि निर्णायक असेल."


२७ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमुळे भारताने ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून मोठा इशारा दिला होता. या कारवाईनंतर पाकिस्ताननेही काहीशा हल्ल्यांचा प्रयत्न केला. अखेर दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी मान्य केली, पण पाकिस्तानने तिचा पुन्हा भंग करत युद्धजन्य तणावाला पुन्हा चिघळवलं आहे.

Comments
Add Comment