नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

  142

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट सवाल करत मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर तोफ डागली आहे.


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीनंतर शेलार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही नालेसफाई नाही, ही कामांची फसवणूक आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आणि पालिकेचे अधिकारी गप्प बसलेत.” मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री आशिष शेलार यांनी कामाबद्दल असमाधान व्यक्त करीत एकूण कामे ही बेभरवशाची आहेत, असे निरिक्षण माध्यमांशी बोलताना नोंदवले.



अधिकाऱ्यांची तांत्रिक थेरं उघडी पडली!


मिलेनियम नाल्यावर गाळ काढतानाचा व्हिडिओ, रिकामा डंपर दाखवण्याची मागणी केली असता अधिकारी गप्प. ज्या अ‍ॅपवर माहिती पाहायची, ते अ‍ॅपही अपडेट नव्हतं. त्यामुळे शेलार भडकले. “AI वापरताय म्हणता, पण कोणतं मशीन, कसं मोजता हे दाखवायलाही तयार नाही? म्हणजे सगळं ठरवलेलं नाटकच आहे.” असा हल्लाबोल करत शेलार यांनी अधिका-यांची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली.



“आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून लक्ष द्यावे!”


शेलार म्हणाले, “या ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण? कंत्राटदारांना पाठीशी घालणं थांबवा. ही कामं वेळेत आणि पारदर्शकपणे झाली पाहिजेत. नाहीतर पावसात मुंबई पुन्हा बुडणार, आणि त्याचे पाप महापालिकेवर जाईल.”


सांताक्रूझ पश्चिम येथील गझदरबांध येथून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्र, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गझदरबांध नंतर एस.एन.डी.टी नाला, ईरला नाला, मोगरा, शहिद भगतसिंग नगर नाल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली. त्या त्या विभागातील स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक या दौऱ्यात सहभागी झाले होते.


नालेसफाईचं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी होते असे अधिकाऱ्याने सांगितल्यावर मिलेनियम नाला येथे संबंधित अधिकारी वर्ग नाल्यातील गाळ काढल्यावर भरतानाचा आणि नंतर भरलेल्या डंपरचा तसेच रिकाम्या होणाऱ्या डंपरचा व्हिडिओ दाखवू शकले नाहीत. त्यामुळे नालेसफाईची व्हिडिओ ग्राफी हे प्रत्यक्षात किती होते याची माहिती व्हिडिओ वरून मिळाली नाही आणि तंत्रज्ञानाचा नक्की कसा आणि कुठे उपयोग केला जातो याची माहिती पर्जन्य जलवाहिनी खात्याचे अधिकारी देऊ शकले नाहीत. ज्या अॅपवर माहिती देणार असे सांगितले जाते तेही अधिकाऱ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेही अपडेट नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एकूणच बेभरवशाची कामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.


दरम्यान याबाबत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, गझदरबांध येथील नाल्यांची कामे गेल्या ३५ दिवसांत १० टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेली नाहीत, अशी माहिती समोर आली आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. उर्वरीत महिन्यात हे काम कसे पूर्ण होणार याबाबत आम्ही प्रशासनाला पाठपुरावा करु. तर काही ठिकाणी २० ते ३० टक्के काही ठिकाणी ५० टक्के सांगितली जात आहेत. पण सगळे बेभरवशाची कामे सुरु आहेत. पण केवळ टीका टिप्पणी करुन चालणार नाही. आम्ही आयुक्तांना सांगू की, तुम्ही स्वतः रस्त्यावर या, आणि कामाची पाहणी करा. मुंबईकरांना गैरसोय होऊ नये म्हणून ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत त्यासाठी आवश्यक ती, यंत्रणा लावा. कंत्राटदारांकडून नालेसफाईची कामे वेळेत करुन घेणे आवश्यक आहे.


कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत ते अनुत्तरीत आहेत. गाळ काढताना नाल्यांची लांबी, रुंदी, उंची, खोली कशी मोजली जाते? ती कुठून कशी मोजली जाते? त्याचे प्रमाण काय? आधुनिक तंत्रज्ञान आणि AI च्या मदतीने गाळाचे मोजमाप केले जाते. मग त्यासाठी कोणत्या मशीन्स वापरतात? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? हे काहीच दाखवायला कंत्राटदार तयार नाहीत. ही बाब मुंबई आयुक्तांच्या लक्षात आणून देऊ, असेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.


दरम्यान, या बेभरवशाच्या कामांमुळे शंका उपस्थित होतेय की, ही कामं राजकीय आशीर्वादाने चाललीयेत का? कोट्यवधींचे कंत्राटे मिळवणारे ठेकेदार कुठे झोपलेत? शेलार यांच्या टीकेमुळे महापालिकेच्या प्रशासनाचा, अधिका-यांचा आणि सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा समोर येतोय.

Comments
Add Comment

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली