
ठाणे शहरात काही भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून स्टेम होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी रात्री. ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परिणामी, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते रा. ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी रा. ९ पासून शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९ वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील.
शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.