Tuesday, April 29, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

माजी महापौर दत्ता दळवींसह विक्रोळी, कांजूर, भांडूपपासून धारावीपर्यंत हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

माजी महापौर दत्ता दळवींसह विक्रोळी, कांजूर, भांडूपपासून धारावीपर्यंत हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर कडाडून हल्ला

मुंबई : मुंबईत आज राजकीय भूकंप घडला! माजी महापौर दत्ता दळवी यांनी तब्बल ५०० हून अधिक कार्यकर्त्यांसह उबाठा गटाचा निरोप घेत थेट शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाने विक्रोळी, कांजूर, भांडूपपासून धारावीपर्यंत उबाठा गटाला मोठा धक्का बसला.

या वेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही मुंबई स्वच्छ केली, ब्रिटीशांनंतर महायुतीने पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले. पण काहींनी मुंबईची तिजोरीच साफ केली! महापालिका ही काहींची जहागिरी नव्हती.” ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत जवळपास ७० नगरसेवक शिवसेनेत परतले असून लवकरच महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे.

फक्त मुंबई नव्हे, तर मुरबाड, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव जिल्ह्यातून देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा गटातील हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. यामध्ये १८ सरपंच, २२ जिल्हाध्यक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक ख्रिस्ती बांधवांचा समावेश होता.

“हिंदुह्र्यसम्राट बाळासाहेब व धर्मवीर दिघेंचे विचार आणि दिलेला शब्द आम्ही पाळतोय, म्हणून लाखो कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत. आम्ही ८० जागा लढून ६० जिंकलो, आणि ते १०० लढून फक्त २०! जनतेने ठरवलंय – खरी शिवसेना कोणाची.”, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

लोक सोडून का जातात याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप केले जातात. त्यांना कचरा म्हणता मात्र एक माणूस बरोबर आणि लाखो चूक कसे असू शकतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पहलगाममधील हल्ल्याचा आम्ही निषेध केला. पर्यटकांच्या पाठिशी शिवसेना आणि सरकार पूर्ण ताकदीने उभे आहेत. मात्र या घटनेवर राजकारण कुणी करु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment