कथा – रमेश तांबे
सकाळचे दहा-साडेदहा झाले असावेत. सूर्याचं तळपणं सुरू झालं होतं. हवेतली उष्णता वेगाने वाढत होती. खरे तर एप्रिल महिन्याचे दिवस सुरू होते. हवेत असहाय असा उकाडा होता. घराच्या बाहेर पडूच नये असं वाटत होतं. तरी महत्त्वाचे काम असल्याने मी पश्चिम रेल्वेने दादरहून विरारच्या दिशेने निघालो. रविवारचा दिवस असल्याने गाडीत तुलनेने गर्दी कमी होती. खिडकी जवळची जागा पटकावून मी निवांत बसलो. गाडीने वेग पकडला तसा गरम हवेचा झोत अंगावर आदळू लागला. तो टाळण्यासाठी मी उलट्या बाजूला बसलो. जेणेकरून गरम हवा अंगावर येणार नाही. मग निवांत झालो आणि हातातलं वृत्तपत्र उघडून बातम्यांमध्ये डोकं खूपसलं.
हिंदू-मुस्लीम समाजात वाढत चाललेली तेढ! दंगली, जाळपोळ, मारामाऱ्या, घटस्फोट, आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणं, नेतेमंडळी, शासकीय अधिकारी वर्गाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या. या साऱ्या बातम्यांनी मनात निराशेचे ढग दाटून आले. मन सुन्न झाले. मग मी पेपर मिटून घेतला अन् विचारांच्या अधीन झालो. गाडीने वांद्रे स्थानक सोडले अन् दोन व्यक्तींनी आमच्या डब्यात प्रवेश केला. भडक रंगाचे मळके कपडे त्यांनी घातले होते. विस्कटलेले केस, दाढीचे वाढलेले पांढरे खुंट, एकाने डोक्याभोवती गुंडाळलेले फडके अन् दारिद्र्याने गांजलेले निराश चेहरे! अगदी कुणालाही कीव वाटावी अशीच त्यांची नजर! माझं मन एकविसाव्या शतकातील भारत आणि वस्तुस्थिती अशी तुलना उगाचच करू लागलं! एकाच्या गळ्यात हार्मोनियम म्हणजेच पेटी आणि दुसऱ्याच्या हातात काठी होती. आता त्यातला एक जण खड्या आवाजात विठ्ठलाची गाणी म्हणू लागला. तोच गाडीतल्या सहप्रवाशांनी आपापल्या माना त्यांच्याकडे वळवल्या.
“माझे माहेर पंढरी” हा अभंग त्याने इतका छान म्हटला की बस्स! काही प्रवाशांनी, तर टाळ्याच वाजवल्या. मीही त्यांच्या गायकीवर आणि पेटी वाजवण्याच्या कलेवर बेहद्द खूश झालो. आता जाता जाता त्यांना काही पैसे रुपी मदत केली पाहिजे हा विचार मनात चमकून गेला. त्यातला जो पेटी वादक होता त्याला थोडेसे दिसत असावे. कारण तो दुसऱ्याचा हात धरून त्याला लोकांपुढे उभा करत होता.
त्यानंतर त्याने चक्क माझा आवडता अभंग गाण्यासाठी निवडला आणि तो म्हणजे “कानडा राजा पंढरीचा!” मग काय पुढची आठ-नऊ मिनिटे आम्ही सारेच विठ्ठल नामात तल्लीन झालो. पेटीवाला वादक त्याला तेवढीच तोलाची साथ देत होता. गाडीतली सारी माणसे त्यांच्या गायकीवर खूश झाली. पेटीवाल्याने पेटीवरच मदतीसाठी थाळी ठेवली होती. त्यात पटापटा पैसे पडू लागले. आता ते भिकारी नसून गायक आहेत, वादक आहेत आणि आम्ही सगळे प्रवासी नसून रसिकश्रोते आहोत असा माहोल डब्यात तयार झाला. बोरीवली स्टेशन येईपर्यंत त्यांनी जवळपास सहा-सात अभंग गायले. मघाशी वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून निराश झालेले मन अभंग श्रवणाने आनंदित झाले. मी तर त्यांच्या गायकीवर खूप खूश झालो. त्यांच्या थाळीत पन्नास रुपयाची नोट टाकावी असा विचार मनात येताच पेटी वाजवणाऱ्या माणसाने आपल्या गायक मित्राला हाक मारली “अरे अब्दुल चल, अभी अपना बोरीवली स्टेशन आनेवाला है!” “हा चंदू चल जाऊया!” गायक अब्दुल म्हणाला.
त्यांच्या या वाक्यांनी माझ्यावर अक्षरशः कोणीतरी गार गार पाण्याचा हंडा रिकामा केला आहे असेच वाटले. खरंच मी तर अगदी अंतर्बाह्य थिजूनच गेलो. काय! नाव अब्दुल! आणि विठ्ठलाचे अभंग गातोय…? अगदी अस्खलित मराठीत अन् तेही इतक्या तल्लीन होऊन! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला.
एका बाजूला धर्माच्या, भाषेच्या नावाखाली चाललेल्या दंगली, जाळपोळ आणि लुटालूट. त्यात होणारी सामान्यांची होरपळ अन् दुसऱ्या बाजूला माणूसकी हाच धर्म समजून पोटासाठी एकत्र आलेले हिंदू-मुस्लीम मित्र! त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, जिव्हाळा मनाला अगदीच स्पर्शून गेलं आणि अनेकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनदेखील घातलं गेलं. कारण उठसूट धर्म, भाषा बुडाल्याच्या गोष्टी करत समाजमन गढूळ करण्याचं काम अनेकांकडून चालू असतं. पण ही अब्दुल-चंदूची जोडी “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा माणुसकी धर्माचा मंत्र आळवत आमच्या पुढे आदर्श निर्माण करू पहात होते.
त्यांच्या थाळीत शंभर रुपयांची नोट मोठ्या नम्रपणे ठेवत मी त्यांच्या माणुसकी धर्माला आणि गायकीला सलाम केला!