कल्याण : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणून कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा उद्या (दि २२) बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि २२) कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या अशुध्द आणि शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम उद्या (दि २२) करण्यात येणार आहे.
या कामासाठी नऊ तासाचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन कल्याण महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.