नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

Share

– सुनील जावडेकर

सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार घडवून आणू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या एकलव्य एकल शाळांचे भले मोठे जाळे हे आहे.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील सात जिल्ह्यात जवळपास ११०० एकलव्य एकल शाळा उभ्या राहिल्या आहेत आणि त्या अखंडपणे सुरू आहेत. या एकलव्य एकशिक्षकी शाळांच्या माध्यमातून सुमारे ३०,००० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे विलक्षण काम गेल्या २९ वर्षांपासून कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून अव्यहातपणे सुरू आहे. सरकारी मदतीची एक दमडीही न घेता लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था ही सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आणि त्यातही उल्लेखनीय म्हणजे भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या बळावर आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर एकलव्य एकल शाळा सुरू करणार आहे. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात शाळाबाह्य मुलांची संख्या ही सुमारे नऊ लाखांच्या घरात आहे. आगामी काळात यातील किमान एक लाख शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने आखले आहे.

जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना…!
तेवत्या राहो सदा, रंध्रातूनी संवेदना… !

या गीताच्या ओळी आपल्या कामाचा आधार मानून काम करणारी संस्था म्हणजे नागपूरची कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्था.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे… इतकंच नाही तर शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे, असंही बाबासाहेब आवर्जून सांगत. असाच शिक्षणाचा वसा गेली २९ वर्षे ही संस्था अत्यंत भक्कमपणे हा वसा जपत आहे. गेल्या २९ वर्षांत मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून कामाचा वटवृक्ष उभा
राहीला आहे.

कै. लक्ष्मणराव मानकर हे गोंदिया या दुर्गम जिल्ह्यातील आमगाव या छोट्याशा गावचे. मानकर गुरुजींना परिस्थितीमुळे आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण यामुळे खचून न जाता लक्ष्मणराव मानकर यांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले आणि जोपासले. आपल्याला शिक्षणाच्या अभावामुळे अनेक गोष्टी करता आल्या नाहीत याची खंत मानकर गुरुजी कायम बोलून दाखवत. लक्ष्मणराव मानकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक देखील होते तसेच ते विदर्भातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून देखील गेले होते. ते काही काळ महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार देखील होते. ज्या नितीन गडकरींच्या नेतृत्वाची भुरळ तरुणांपासून आभार वृद्धांपर्यंत सर्व थरातील जनतेमध्ये आहे त्या नितीन गडकरी यांना राजकारणात आणले ते स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी. यामुळेच गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेची पूर्तता करण्याचा चंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आणि एका वटवृक्षाचं बीजरोपण झालं.

२९ वर्षांपूर्वी या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील काही कार्यकर्त्यांनी चार विद्यार्थ्यांसह शिक्षण विषयात कामाला सुरुवात केली. जंगल, खेड्यात वस्ती करून राहणाऱ्या बांधवाना बदलत्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींमुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात सुद्धा अनेकदा अडचणी निर्माण होतात. मागास, दुर्गम भागात राहणाऱ्या आणि आदिवासी समाजातील वर्तमान आणि भविष्यातील पिढ्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात की काय? अशी भीती निर्माण होऊ लागली. यामुळे अशा सगळ्यांसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन काम करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. या सगळ्या कार्यकर्त्यांना मोलाची आणि भक्कम साथ मिळाली ती भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची.

मोठ्या शाळा उभ्या करणं, त्यासाठी लागणारी इमारत, शिक्षक आणि या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज होती. इच्छा शक्ती प्रचंड होती पण पैसा नव्हता. पण काम करणाऱ्या व्यक्तींना समाज उपयोगी काम करण्यापासून पैसा कधीच अडथळा ठरत नाही. कारण परमेश्वराचा आशिर्वाद अशा कामांच्या पाठीशी असतो. मोठ्या निधीच्या अभावी एक वेगळी कल्पना पुढे आली ती एकलव्य एकल विद्यालयाची. या एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि शिक्षणाच्या दृष्टीने मागास अशा भागात एक शिक्षकी शाळांच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. या शिक्षणाच्या गंगेचा प्रवास एकलव्य एकल विद्यालय या मार्गाने सुरु झाला. अशा एक शिक्षकी शाळा सुरू करतांना काही उत्साही कार्यकर्त्यांनी फक्त २५ हजार रुपये गोळा केले आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून चार विद्यार्थ्यांची पहिली एक शिक्षकी शाळा सुरू झाली.. एक शाळा… एक गाव…. अनेक विद्यार्थी आणि जास्तीत जास्त शिक्षण अशा पद्धतीने काम सुरू झालं..

पहिल्या वर्षी साधारण ८ ते १० एकलव्य एकल शाळांपासून हे काम सुरू झाले. आज तिशीच्या उंबरठ्यावर असतांना साधारण अकराशे (११००) शिक्षकांच्या माध्यमातून ३० हजार विद्यार्थी या एक शिक्षकी शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या सगळ्या शाळा विदर्भाच्या गडचिरोली या नक्षलप्रभावी जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या शाळा सुरू आहेत.

गेल्या २८ वर्षांचा विचार केला, तर जवळपास एक पिढी या एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यामातून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं महत्वाचं काम कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
आपण एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाची या वर्षीची आकडेवारी संस्थेच्या कामाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता लक्षात आणून देणारी आहे. गडचिरोलीमध्ये कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून ३४० एकल शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये १०,१२० विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ४० शाळांच्या माध्यमातून १२९० विद्यार्थी, भंडारा जिल्ह्यात ३० शाळांमध्ये मिळून, तर गोंदीया जिल्ह्यात १६० शाळांच्या माध्यमातून ५५८८ विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचा उपक्रम सुरू आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट सह १८० दुर्गम भागात शाळांच्या माध्यमातून ६०६८, तर अकोल्यात ५३ आणि बुलढाण्यात ५२ शाळांमधून अनुक्रमे १३५० आणि १२९६ विद्यार्थी एकल विद्यालयात येऊन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात सुद्धा १८० एकलव्य एकल शाळांच्या माध्यमातून ३६४० विद्यार्थी सहभागी होतात. म्हणजे ८ जिल्ह्यांमध्ये मिळून २४-२५ या वर्षासाठी १०३५ (एक हजार पस्तीस ) शाळा आणि तेवढ्याच म्हणजे १०३५ शिक्षकांच्या माध्यमातून ३०३८२ विद्यार्थी शिक्षणाच्या ज्ञानगंगेत सहभागी होत आहेत.

या सगळ्या एकलव्य एकशिक्षकी शाळा उत्तम पद्धतीने चालाव्यात यासाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे १३४ कार्यकर्ते या सगळ्या ८ जिल्ह्यांमध्ये सतत प्रवास करतात. शाळा नीट चालाव्यात, विद्यार्थी-शिक्षकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी कर्तव्यदक्ष असतात. एकलव्य एक शिक्षकी शाळेत येणाऱ्या मुलांकडे अभ्यासाबरोबरच त्यांचा आहार, खेळ, सामाजिक जाणीवा अशा सगळ्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजेच मुलांच्या सर्वांगिण उन्नतीचा वसा कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे उचलला आहे. शाळेत येणाऱ्या सगळ्या मुलांचा त्यांच्या पालकांबरोबर पण मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी आठ जिल्ह्यात असे ८५ बालक-पालक मेळावे झाले. यामुळे मुलांच्या शिक्षणाबद्दल पालकांच्या मनातल्या प्रश्नांना सुद्धा उत्तरं दिली जातात, मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातल्या गावांमध्ये सरकारच्या योजना पोहोचाव्यात, त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन कायमच सक्रीय असते. अनेक गावं अशी आहेत जिथल्या आरोग्य सर्वेक्षणापासून पाणी योजनेच्या अंमलबजावणीच्या शासकीय कामात सुद्धा संस्थेच्या कार्यकर्त्यांचा, शिक्षकांचा सहभाग राहीला आहे. या उपक्रमात सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. वर्गातील शिक्षण ते लोकशिक्षण अशा सगळ्या विषयात पारंगत असलेला शिक्षक असेल, तर सामाजिक अभिसरणाची ही चळवळ यशस्वी होण्यासाठी जास्त मदत होईल. म्हणूनच मानकर स्मृती संस्थेतर्फे अशा सगळ्या शिक्षक आणि कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक सुद्धा उत्तम हवेत. मुलांना शिकवणारे शिक्षक सुद्धा खास प्रशिक्षण घेतलेले असतील याची विशेष काळजी घेण्यात येते. या सगळ्या शिक्षकांच्या वार्षिक आणि निरंतर प्रशिक्षणाची जबाबदारी सुद्धा मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून उचलण्यात आली आहे. ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, महिला बचत गट, शेतकरी बचत गट या माध्यमातून समग्र ग्राम विकासाचं ध्येय संस्थेने अंगिकारलं आहे. एकलव्य एकल विद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यात अपघात वीमा संरक्षण, उज्ज्वला गॅस योजना, आणि अटल पेंन्शन योजना या सरकारी योजनांचा लाभ एकल विद्यालयाच्याच मुलांना आणि पालकांना नाही, तर सगळ्या गावकऱ्यांना मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियोजनबद्ध काम सुरू आहे. दुर्गम आणि मागास भागातील मुलांना एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून शालेय शिक्षण देऊन संस्था थांबली नाही, तर निवडक मुलांना शिक्षणाची अधिक उत्तम संधी मिळावी यासाठी संस्थेने ६५ मुलं आणि ६० मुली यांना नागपूरमध्ये आणलं. या सगळ्या विद्यार्थ्यांची ५ वी ते १२ ची शिक्षणाची व्यवस्था संस्थेने केली आहे. हिंदू मुलींची शाळा, तर मुलं टिळक विद्यालयात शिकतात. तर ११५ विद्यार्थ्यांची अमरावतीमधल्या अंजनगाव सुर्जी इथे शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचं माणूस घडवण्याचं काम इथं संपत नाही. कारण हे नुसतं काम नाही तर तो ध्यास आहे, मानकर गुरुजींकडून घेतलेला वसा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारची सरकारची मदत न घेता हे माणूस निर्माणाचं शिवधनुष्य उचललं आहे. संस्थेने मुलांना शिक्षणाच्या नंतर हाताला काम देण्यासाठी खास अभियान सुरू केलं आहे. ते म्हणजे कौशल्य विकासाचं जेणेकरून शिक्षणानंतर या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पुण्यातील ज्ञानदा गुरूकुल यांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी इथे गेल्या दोन वर्षांपासून खूप मेहनतीने कौशल्य विकासाचा उपक्रम राबवला आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पातून ११० तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे, तर ५६ मुलांना पुण्यात नोकरी सुद्धा मिळाली आहे. संस्थेने गेल्या जवळ जवळ तीन दशकात माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विदर्भाच्या आठ जिल्ह्यातून सुरू झालेल्या या कामाला आता राज्याच्या सर्व जिल्ह्यात कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचं काम नेण्याचा नितीन गडकरी यांचा प्रयत्न आहे.

Recent Posts

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

54 seconds ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

15 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

15 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago