
भालचंद्र ठोंबरे
शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न व प्रजा वत्सल होता. त्याला अनेक राण्या होत्या; परंतु असे असूनही त्याला अपत्य नव्हते. म्हणून तो दुःखी होता. एके दिवशी ब्रह्मदेवाचे पुत्र अंगीरा ऋषी चित्रकेतूकडे आले. चित्रकेतूने त्यांचा योग्य आदरसत्कार केला. त्यांनी चित्रकेतूला तुला काही काळजी आहे का? असा प्रश्न केला तेव्हा चित्रकेतुनी त्यांना आपले दुःख सांगितले. अंगीरांनी एक यज्ञ करून त्याचा प्रसाद राणीसाठी दिला. राजाने तो प्रसाद ज्येष्ठ राणी कृतधृतीला दिला. कालांतराने कृतधृतीला पुत्र झाला. राजाने त्या प्रित्यर्थ भरपूर दानधर्म केला. पुत्रप्राप्तीमुळे आनंदित झालेल्या राज्याचा अधिकाधिक वेळ कृतधृती व लहान मुलासोबत जाऊ लागला. त्यामुळे अन्य राण्यांमध्ये मत्सर निर्माण झाला. या परिस्थितीला नवजात शिशु कारणीभूत असल्याचे मानून त्या राण्यांनी कटकारस्थान करून नवजात शिशुला विष दिले. त्यामुळे तो मरण पावला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वजण शोक मग्न झाले. अन्य राण्यांच्या कटकारस्थानापासून अनभिन्न असलेले चित्रकेतू व राणी शोक सागरात बुडून गेले.
अन्य राण्यासुद्धा रडण्याचे नाटक करू लागल्या. दुःखातिरेकाने राजा चित्रकेतू बेशुद्ध झाला. हे पाहून अंगीरा ऋषी नारदासह तेथे आले. त्यांनी शोकमग्न चित्रकेतूची समजूत काढली. तसेच तू आता ज्यांच्यासाठी शोक करतो आहे तो तुझा मागच्या जन्मी कोण होता आणि पुढच्या जन्मातही त्याचा व तुझा काय संबंध असेल? तेव्हा आता शोक करणे व्यर्थ आहे. असा उपदेश केला. तू भगवंताचा भक्त असल्याने तुला शोक होणे योग्य नाही म्हणून तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे स्पष्ट केले. यापूर्वीच्या भेटीतच तुला अनुग्रह देण्याचा विचार होता; परंतु तुला पुत्राची आस होती म्हणून तुला वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून तुला पुत्रच दिला. आता पुत्र असला तरीही कसे दुःखाला सामोरे जावे लागते याचा अनुभव तुला आला.
तेव्हा नारद म्हणाले “ हे राजन ! हे सर्व मिथ्या आहे. तू ध्यान व धारणा करून भगवान संकर्षणाचे दर्शन प्राप्त करून मोक्ष प्राप्ती करून घे’’. त्यानंतर चित्रकेतूचा मोह नाहीसा करण्यासाठी त्यांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा सर्व शोकाकुल राजा व परिवाराला दाखविला. त्या जिवात्म्याला माता-पित्याचा परिचय दिला. तेव्हा तो जिवात्मा म्हणाला, ‘‘मी आपल्या कर्मानुसार अनेक योनीतून भटकत असतो. तेव्हा हे कोणत्या योनीतील माझे माता पिता आहेत? जिवात्म्याला कोणी प्रिय अप्रिय नसतो. आपला परका नसतो. हा नेहमी त्रयस्थ असतो.” असे म्हणून जीवात्मा निघून गेला. जिवात्म्याकडून हे तत्त्वज्ञान ऐकल्यावर राजाचा शोक नाहीसा झाला, व त्याने मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. नारदांनी त्याला भगवान संकर्षणाच्या प्राप्तीचा ध्यानधारणा मार्ग कथन केला व अंगीकारासह निघून गेले. राजा चित्रकेतूने नारदांच्या आदेशाप्रमाणे सात दिवस केवळ पाणी पिऊन अनुष्ठान केले व त्यायोगे त्याला विद्याधरांचे अखंड अधिपत्य मिळाले व तो देवाधिदेव भगवान शेषांच्या चरणाशी पोहोचला. संकर्षणाचे दर्शन झाल्याने त्याची सर्व पापे नष्ट झाली. त्याने भगवंताची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान संकर्षणांनी चित्रकेतूला नारदांच्या उपदेशाने व माझ्या दर्शनाने तू सिद्ध झाला आहेस असे म्हणून आशीर्वाद व एक विमान दिले. अशा प्रकारे चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या विमानातून संचार करीत असता ऋषीमुनींच्या सभेत भगवान शंकरांना माता पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेले पाहिले. व त्यावर त्याने टिकाटिप्पणी केली. त्यामुळे माता पार्वतीने क्रोधीत होऊन चित्रकेतूला असूर योनीत जाण्याचा शाप दिला. तेव्हा चित्रकेतू माता पार्वतीला नमस्कार करून व शापाचा स्वीकार करून, निघून गेला. हे पाहून माता-पार्वती आश्चर्यचकित झाली.
तेव्हा भगवान शंकर म्हणाले “हा चित्रकेतू भगवान विष्णूंचा परमभक्त आहे, म्हणून तो सर्वांना समान दृष्टीने पाहतो व शांत असतो. मी सुद्धा विष्णूचा प्रिय असल्याने मलाही त्याचा राग येत नाही. त्यामुळे जो विष्णूचा भक्त आहे व जो त्यांच्या प्रति समर्पित आहे असा मनुष्य कोणालाही घाबरत नाही, कारण तो स्वर्ग मोक्ष नरकातही नारायणालाच पाहत असतो.” पार्वतीने दिलेल्या शापामुळे चित्रकेतू पुढच्या जन्मी राक्षसराज वृत्रासूर म्हणून जन्माला आला. मात्र तेथे सुद्धा ज्ञानविज्ञान संपन्न राहिला. त्याचा इंद्राने वध केला. चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णू महात्म्य जो ऐकतो तो संसार बंधनातून मुक्त होतो असे श्रीमद् भागवतात सांगितले आहे.