सहा महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाची दाखल केली तक्रार
मुंबई : परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) न्यायवैद्यक व विषविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र देवकर (Dr Ravindra Deokar) यांना सहा महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
या सहा महिला डॉक्टरांनी १२ एप्रिल रोजी भायखळा येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना डॉ. देवकर यांनी वारंवार अश्लील वर्तन केल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी त्यांच्या केईएम वसाहतीतील निवासस्थानावर नोटीस चिकटवली आहे, कारण अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांचा फोन बंद असून घरीही कोणी सापडले नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितले.
Mumbai : माहिमच्या दिलीप गुप्ते यांच्या नावासमोर लेफ्टनंट लिहायचा महापालिकेला विसर
दरम्यान, महापालिकेच्या अंतर्गत लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने (POSH) आणि रुग्णालय प्रशासनानेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. डॉ. देवकर यांनी “मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी तक्रारीची माहिती घेतली असून, चौकशीला पूर्ण सहकार्य करेन,” असे वक्तव्य केले आहे.
डॉ. देवकर यांच्या वतीने त्यांचे वकील सौरभ ताम्हणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असून, ही सुनावणी शनिवारी होणार आहे.
डॉ. देवकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ (अनिच्छित शारीरिक संपर्क, संकेत वा लैंगिक टिप्पणी), ७५ (लज्जा भंग करण्याच्या हेतूने गुन्हेगारी बलप्रयोग) व ७९ (लज्जा भंग करण्याच्या हेतूने उद्देशाने केलेली कृती) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सहा डॉक्टरांनी १० एप्रिल रोजी विभागप्रमुख डॉ. हरीश पाठक व अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. विशेष म्हणजे, २०२१ मध्येही डॉ. देवकर यांच्याविरोधात एका महिला डॉक्टरने अशीच तक्रार केली होती, परंतु त्या नंतर परदेशात गेल्यामुळे प्रकरण पुढे नेले गेले नाही, अशी माहिती डॉ. रावत यांनी दिली. यावेळी मात्र त्यांनी प्रकरण थेट अतिरिक्त महापालिका आयुक्त व बीएमसी रुग्णालयांच्या संचालकांकडे सोपवले आहे.