मुंबई : बेस्टची पूर्वीची परिस्थिती व आताची परिस्थिती यात फार फरक असून बेस्ट आता डबघाईच्या दिशेने चालली आहे . बेस्टला अशा परिस्थितीत मोठ्या आर्थिक मदतीची गरज असून बेस्ट वाचवण्यासाठी आपण येत्या दहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक घेणार असल्याची माहिती गुरुवारी खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी खासदार नारायण राणे यांनी बेस्ट भवनात बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. एस. आर. श्रीनिवासन यांची भेट घेतली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . आज बेस्टला मोठ्या मदतीची अपेक्षा असून मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता पालिकेकडून आता जास्त काही मिळेल व बेस्ट सुधारण्यास मदत होईल. असे वाटत नाही, असे सांगताना ते पुढे म्हणाले की, बेस्ट कामगारांचे विविध प्रश्न व निवृत्त कामगारांची थकबाकी या विषयांवर आपण महाव्यवस्थापकांशी विस्तृत चर्चा केली असून बेस्टला मिळणाऱ्या उत्पन्नातून बेस्टचा गाडा हाकणे आता अशक्य बनले आहे . त्यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली आहे. राज्य सरकारने कोविड भत्ता बेस्ट उपक्रमाकडे दिला असूनही तो कर्मचाऱ्यांना अजून मिळालेला नाही. या विषयावर बेस्ट महाव्यवस्थापकांनी सत्य परिस्थिती आपणास दिली आहे. आता मोठी आर्थिक मदतच बेस्टला तारेल असे आपल्याला वाटत असून आपण त्यासाठीच येत्या दहा दिवसाच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, बेस्ट महाव्यवस्थापक, महापालिका आयुक्त यांची एकत्रित भेट घेणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
बेस्टकडे सध्या ८५० स्वमालकीच्या बसगाड्या असून ८ हजार बसगाड्यांची गरज आहे. महापालिकेने दिलेल्या निधीतून फक्त ३०० बस गाड्या घेता येईल. मात्र त्याने प्रश्न सुटणार नसून बसगाड्या घेतल्या तरच बस प्रवासी वाढतील त्यासाठी मोठ्या मदतीची आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले .
बेस्टला पूर्वीचे दिवस प्राप्त करुन देणार
जगातील कुठलाच परिवहन फायद्यात नसून परिवहन सेवा या आर्थिक मदतीवरच चालतात, आपण तीन वर्षे बेस्ट समिती अध्यक्ष राहिलो असून आता आपल्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने आपण बेस्टमधील समस्यांचा पाठपुरावा करू व बेस्टला पूर्वीसारखे दिवस प्राप्त करून देऊ, अशी ग्वाहीही नारायण राणे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार, खजिनदार विनोद राणे, उपाध्यक्ष हर्षद देऊळकर, प्रकाश राणे, गुरु महाडेश्वर , चिटणीस संगीता पुराव उपस्थित होते.
बेस्टसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू
बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रश्न प्रलंबित असून त्याकडेही आपण महाव्यस्थापकांचे लक्ष वेधले असल्याचे नारायण राणे सांगितले . पूर्वी बेस्ट परिवहन विभागाचा तोटा हा विद्युत विभागाकडील फायद्यामुळे भरून निघत असे. आता मात्र एम इ आर सी नियमनामुळे तसे करता येत नाही. त्यामुळे बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे यासाठी पूर्वीप्रमाणेच बेस्टचा तोटा कायमस्वरूपी भरून निघेल असा मार्ग बेस्टसाठी हवा, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्र्यांकडे आग्रही राहू असे नारायण राणे यावेळी म्हणाले .
बेस्ट भवन, कुलाबा येथे बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात व समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांची बैठक पार पडली. या बैठकीला बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास, समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी विलास पवार तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.