Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाज“प्यार का जमाना आया दूर हुए गम...”

“प्यार का जमाना आया दूर हुए गम…”

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

राम और शाम’(१९६७) हा दिलीपकुमारचा पहिला डबलरोल. त्यानंतर त्याने ‘बैराग’मध्ये(१९७६) ३ भूमिका केल्या होत्या आणि त्याच्या शेवटच्या ‘किला’(१९९८)मध्ये पुन्हा डबलरोल निभावला होता. ‘राम और शाम’ हा १९६४ च्या ‘रामुडू भिमुडू’ या तेलुगू सिनेमाचा रिमेक! दोन्हीचे दिग्दर्शक होते तापी चाणक्य. सिनेमाने जबरदस्त धंदा केला. त्यावर्षी सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सिनेमांच्या यादीत त्याचा क्रमांक मनोजकुमारच्या ‘उपकार’ खालोखाल दुसरा होता.

दिलीपला या सिनेमाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे फिल्मफेयर मिळवून दिले. सिनेमात त्याच्याबरोबर वहिदा रेहमान, मुमताज, प्राण, निरूपा रॉय, नझीर हुसैन, बेबी फरीदा, मुक्री, कन्हैयालाल आणि पुढे ‘शोले’त ‘बसंतीकी मौसी’ म्हणून गाजलेल्या लीला मिश्रा होत्या! कथानक अगदी साधेसरळ होते. राम (दिलीपकुमार-१) हा एका श्रीमंत घरातला अतिशय सज्जन युवक. घरी त्याच्याबरोबर बहीण सुलक्षणा (निरुपमा रॉय) पुतणी कुकू (बेबी फरीदा) आणि घरजावई मेहुणे गजेंद्र (प्राण) राहत असतात. त्याच्या गरीब स्वभावामुळे घरात फक्त प्राणची सत्ता चालते. तो रामला अनेकदा चाबकाने फोडून काढत असतो. यावेळी प्राण आणि दिलीपमध्ये अभिनयाची जणू स्पर्धा लागली होती. प्राणने खलनायकाचा क्रूरपणा आणि दिलीपने त्याचा भित्रेपणा इतका बेमालूनपणे वठवला होता की, आपल्याला पहिल्या काही मिनिटांतच प्राणचा संताप येऊ लागतो! गरीब बिचाऱ्या दिलीपला मदत करावीशी वाटू लागते!

पुढे सिनेसृष्टीच्या अलिखित नियमाप्रमाणे लहानपणीच हरवलेला दिलीपचा दुसरा रोल – शाम हा जुळा भाऊ कथानकात अचानक प्रकट होतो. तो दिलीप-१च्या अगदी उलटा स्वभाव असलेला, आत्मविश्वासू, धाडसी, उमदा युवक असतो. विलक्षण फिल्मी योगायोगाने दोघेही एकमेकांच्या घरात जबरदस्तीने नेले जातात आणि सिनेमाचे खरे नाट्य सुरू होते. ‘शाम’ला राम समजणाऱ्या प्राणचा आक्रमक प्रतिकार करून शाम त्याला चांगलाच सरळ करतो. शेवटी दोन्ही दिलीपांचे अनुक्रमे वहिदा रेहमान आणि मुमताजशी लग्न होते आणि कथेची सुखांतिका होते.

सिनेमाला अतिशय मधुर संगीत होते नौशाद यांचे, तर एकापेक्षा एक गाणी होती शकील बदायुनीसाहेबांची. त्यात ‘बालम तेरे प्यारकी थंडी आग मे जलते जलते, मैं तो हार गयी रे’ हे गोड दिसणाऱ्या मुमताजसाठी तितक्याच गोड आवाजाच्या आशाताईंनी गायले होते! त्यांच्या आवाजाला काय म्हणावे तेच कळत नाही. मादक, खोडकर, नटखट, गोड अशी सगळी विशेषणे आशाताई हक्काने बळकावतात.

त्याशिवाय लतादीदीने रफीसाहेबांबरोबर गायलेले ‘मैं हुं साकी, तू हैं शराबी शराबी’ हे त्याच्या ठेक्याने चांगलेच लोकप्रिय झाले होते. रफीसाहेबांचे ‘आज की रात मेरे दिल की सलामी लेले, दिल की सलामी लेले, कल तेरी बज्मसे दिवाना चला जायेगा, शम्मा रह जायेगी परवाना चला जायेगा’ हे गाणे दिलीप आणि वहिदाच्या प्रेमात आलेल्या दुराव्यामुळे शेवटचा निरोप ठरणारे वाटून अस्वस्थ करून टाकते.

रफीसाहेबांनी गायलेले असेच एक गाणे १९६८साली बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात ७ व्या क्रमांकावर वाजले होते. शामच्या येण्याने घरातले वातावरण बदलले आहे. आधीचे दहशतीचे, अन्याय-अत्याचाराचे वातावरण जाऊन घर हसतेखेळते झाले आहे. हा प्रसंग शकीलजींनी या गाण्यात छान रंगवला होता. गाण्याचे शब्द होते –

‘आयी हैं बहारे मिटे जुल्मो सितम.
प्यार का जमाना आया दूर हुए गम.
रामकी लीला रंग लायी… आ हा हा
शामने बंसी बजायी…’

तसेही पाहिले तर खुद्द श्रीरामाचे जीवनही सहनशीलतेचा नमुनाच होते. दिग्दर्शकाने म्हणूनच कदाचित संयमी सहनशील दिलीपला राम हे नाव दिले होते आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आक्रमक भूमिकेला शाम हे नाव दिले होते. शामच्या आगमनाने घराला जणू नवजीवन प्राप्त झाले आहे. घरातील सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यावरील कायमचा तणाव नाहीसा होऊन तिथे एक मंद स्मित तरळते आहे. शाम त्याची छोटी भाची कुकुला घेऊन नाचतउडत हे गाणे गातो आहे-

‘चमका है इन्साफ का सूरज,
फैला है उजाला…
नयी उमंगें संग लाएगा,
हर दिन आनेवाला.
हो हो मुन्ना गीत सुनाएगा,
तुन्ना ढोल बजायेगा,
मुन्ना गीत सुनाएगा.’
तुन्ना ढोल बजायेगा,
संग संग मेरी छोटी मुन्नी,
नाचेगी छम छम.
आयी हैं बहारे…

शकीलजींनी जणू त्या घरातील भविष्यकाळच्या वातावरणाचे चित्रच गाण्यात केले होते. आधी प्राण आणि त्याची कुटील टीम सर्वांना छळत असते. वाटेल तशी कामे करून घेणे, धड जेवायलाही न देणे, वर मारहाण, कधीकधी तर चाबकाने मारणे हे सुरु असते. आता मी तसे काही घडू देणार नाही अशी ग्वाहीच शाम या गाण्यातून घरातील सर्वांना
देतो आहे –

‘अब न होंगे मजबूरी के इस घर में अफसाने,
प्यार के रंग में रंग जायेंगे सब अपने-बेगाने.
सबके दिन फिर जायेंगे, मंजिल अपनी पाएंगे.
जीवन के तराने मिल के गाएँगे हरदम.
हो, आयी हैं बहारें… मिटे जुल्मो सितम,
प्यार का जमाना आया दूर हुए गम…

घराचा खरा मालक असलेल्या रामला गजेन्द्रने (प्राण) एखाद्या घरगड्यासारखे करून टाकलेले असते. त्याच्या मनात टोकाची भीती आणि न्यूनगंड निर्माण करून ठेवल्याने तो प्रत्येक श्वाससुद्धा दबून घाबरत घाबरत घेत असतो. त्यात त्याच्यासारख्या दिसणाऱ्या शामने आणलेली क्रांती पाहून घरातले सगळे सदस्य हरखून गेलेले असतात.

‘अब न कोई भूखा होगा और न कोई प्यासा,
अब न कोई नौकर होगा और न कोई आका.
अपने घर के राजा तुम, छेड़ो मन का बाजा तुम.
आ जायेगी सुरमें देखो जीवन की सरगम.
हो आयी हैं बहारे मिटे जुल्मो सितम.
प्यार का जमाना आया दूर हुए गम.
राम की लीला रंग लायी आ हा हा,
शामने बंसी बजायी आ हा हा हा.’

त्याकाळी सिनेमातून दिसणारा झगमगाट, सामान्य जीवनात अशक्य वाटणारे नाट्यमय प्रसंग हे सगळे अद्भुत अनुभवात मोडणारे होते. लोकही भावनाशील, साधेसरळ होते, सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव पाहणे हीच त्यांची आवड होती. प्रचंड हिंसा, बेछूट वर्तन, उघडावाघडा लज्जाहीन शृंगार ही त्यांच्या नेत्रेंद्रियांची गरज करण्यात मनोरंजनविश्वाला आजच्यासारखे यश आलेले नव्हते! त्यामुळे असे मनाला सुख देणारे, सत्याचा विजय दाखवणारे, आल्हाददायक सिनेमा चालत असत. कधीकधी त्या सुखद काळात सफर करावीशी वाटली, तर ही गाणी एक भक्कम पूल म्हणून काम करू शकतात. ऐकावीत अशी गाणी कधी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -