पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात उन्हाच्या झळा (Summer Heat) वाढत चालल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात अनेक शहरांसह गावांमध्ये पाण्याची कमतरता (Water Shortage) भासत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी (Water Tanker) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र टँकरची मागणी वाढत असतानाच महापालिकेने टँकरच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका बसत असल्याचे दिसत आहे.
Chaitra Navratrotsav : शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रौत्सव दिमाखात संपन्न!
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत.
काय आहेत टँकरचे दर?
- दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ६६६ रुपये – नवीन दर ६९९ रुपये
- दहा हजार ते पंधरा हजार लिटरपर्यंत : जुना दर १०४८ रुपये – नवीन दर ११०१ रुपये
- पंधरा हजार लिटरपेक्षा जास्त : जुना दर १४७८ रुपये – नवीन दर १५५२ रुपये
- महापालिकेचा टँकर असल्यास (नागरिकांसाठी) दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ११८२ रुपये – नवीन दर १२४१ रुपये