Share

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

आज एक छान कथा तुम्हाला सांगणार आहे. ती निश्चितपणे माझी नाही; परंतु खूप पूर्वीपासून मी ही कथा ऐकत आलेली आहे. उन्हाळ्याच्या टळटळीत दुपारी एक तहानलेला माणूस ज्याच्याकडे पाणी नसते आणि पाणी विकत घेण्याची त्याची ऐपत नसते म्हणून तो एका दुकानात शिरतो. दुकानदार फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. जेवणाची वेळ असल्यामुळे दुकानातील सर्व मदतनीस जेवणासाठी दुकानाबाहेर गेलेले असतात. तहानलेला माणूस त्या दुकानदाराला विचारतो, “दादा, खूप तहान लागली आहे. थोडं पाणी मिळेल का?”

दुकानदार फोनच्या स्पीकरवर हात ठेवतो आणि इकडेतिकडे पाहतो. त्याच्या लक्षात येते की, दुकानात कोणीच नाहीये. तो या माणसाला म्हणतो, “सॉरी दुकानात कोणीच माणूस दिसत नाहीये.”
हा माणूस तत्परतेने उत्तरतो,

“मग थोड्या वेळासाठी तुम्हीच ‘माणूस’ व्हाल का?”
खरंच आपण थोड्या वेळासाठी माणूस होऊया का? विचार करा. आपण किती अपेक्षा करतो समोरच्या माणसाकडून आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर असमाधानी होतो मग विचार करा की, कदाचित ही समोरची सगळी माणसेसुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा करत असतील, त्यांना थोडाफार समाधान देण्याचा प्रयत्न करूया का?

एकदा सकाळी ९च्या सुमारास माझ्या घरात माझी मदतनीस आली आणि धुणंभांड्याचे काम करू लागली. तिच्या येण्याची, तिच्या काम करण्याची इतकी सवय झाली होती की, मी तिच्याकडे नजर उचलूनही पाहिले नाही. मी हॉलमध्ये शांतपणे माझे काम करत बसले होते. थोड्या वेळानंतर स्वयंपाकीन घरात आली. तिला काय करायचे सांगितले आणि मी माझ्या कामात मग्न झाले. स्वयंपाकीनने मदतनीसला विचारले, “काय गं, काय झालं? चेहरा का इतका
सुजला आहे?”

ती म्हणाली, “काल नवरा पिऊन आला. आमचे भांडण झाले. त्याने मला मारले आणि मी उपाशीच झोपले. सकाळी माझ्याकडे बघत होता पण मी घरातला स्वयंपाक करून घराबाहेर पडले. साधा चहापण घेतला नाही. बघू आज संध्याकाळी काही फरक पडतो का त्याच्यात, म्हणजे न पिता येतो का?”

त्या दोघींचे आपसातले बोलणे माझ्या कानावर पडले आणि मला दोन-तीन गोष्टींचे वाईट वाटले. पहिली गोष्ट मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले असते, तर मला कळले असते की, तिच्या नवऱ्याने तिला मारले आहे. दुसरे तिच्या चेहऱ्यावरून मला कळले असते की, ती उपाशी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तिच्याशी बोलले असते, तर मला कळले असते की, तिला कोणाशी तरी बोलण्याची गरज वाटतेय ज्याच्यातून तिला थोडीफार मानसिक शांती मिळू शकते!

जे झाले ते झाले, आता मला काय करता येईल याचा मी विचार केला. काहीच न ऐकल्यासारखे स्वयंपाकघरात गेले आणि म्हणाले, “काल साठेकाकूंनी मिठाई आणली. आम्ही दोघी किती खाणार? चला तुम्ही पण जरा चव बघा असे म्हणून दोघींच्या हातात मिठाईचा एक एक तुकडा ठेवला.”

त्यानंतर काही असो, मी घरात मदतनीस आल्या की, हातातले काम थोडेसे बाजूला ठेवून त्यांच्याशी एक मिनिट का होईना बोलते. स्वयंपाकघरात एक काचेच्या बरणीत चणेशेंगदाणे एकत्र करून डबा ठेवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलेले आहे की, कधी भूक असेल, तर जरूर खा म्हणून! आठवडाभरात तो डबा संपल्याचे माझ्या लक्षात येते. याचा अर्थ खूपदा त्यांना भूक लागलेली असते किंवा काहीतरी खावेसे वाटते!

आपण घरात पाहुणे आले की, आग्रहाने त्यांना नवनवीन पदार्थ बनवून खायला घालतो. चहा, कॉफी, सरबत काय घेणार?, असे विचारतो; परंतु घरात दररोज येणाऱ्या या मदतनीस यांना मात्र काहीही विचारायची तसदी घेत नाही, हे बरोबर नाही. कधी कधी त्याही कोणत्या तरी अपेक्षेने येत असणार! त्यांच्या अपेक्षेला आपण नेहमीच पूर्ण पडू असे नाही; परंतु काही प्रमाणात का होईना आपण नक्कीच त्यांना मदत करू शकतो.

आपणही खूपदा दमून भागून घरी येतो तेव्हा आपल्याला गरम गरम चहा प्यावासा वाटतो. तसा चहा करायला कितीसा वेळ लागतो? परंतु घरातल्यांनी जर विचारले की, अगं चहा टाकू का तुझ्यासाठी? तर किती आनंद होतो.
त्यामुळे सहज शक्य होत असतील अशा छोट्या अपेक्षा आपल्याला जर समोरच्या माणसाला पूर्ण करता आल्या तर त्याला मिळणारे समाधान पाहून आपल्यालाही खूप मोठे समाधान लाभते! चला थोडेसे ‘माणूस’ बनूया!

pratibha.saraph@ gmail.com

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

26 minutes ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

3 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

3 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago