भालचंद्र कुबल – पाचवा वेद
आजचं निरीक्षण थोड्या वेगळ्या प्रकारचं आहे. हा मराठी भाषा समीक्षेच्या अध्यायातील एक प्रयोग आहे असं समजायला हरकत नाही. एखाद्या स्तंभलेखकाच्या वैचारिक आणि अनुभवजन्य लिखाणास जर मर्यादा येत असतील, तर त्या परिप्रेक्षातील तज्ज्ञ मंडळींच्या सहाय्याने किंवा त्यांच्याशी चर्चा करून स्वतःचे पक्के मत मांडल्यास काय होईल? त्या तज्ज्ञांच्या अनुभवजन्य विचार मंथनातून माझा त्या कलाकृतीबाबतचा अॅप्रोच पूरक आणि सकारात्मक होऊ शकतो का? याचा अंदाज मी या प्रयोगाद्वारे केला.
बुधवार, ९ एप्रिल २०२५, वेळ सायं. ५ वाजता, स्थळ-यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, विषय – ‘तोडी मिल फँटेसी’ या नाटकाबाबतची पत्रकार परिषद. ‘तोडी मिल फँटेसी’ हे प्रायोगिक नाटक साधारण दोन-अडीज वर्षांपूर्वी रंगभूमीवर प्रकाशित झाले. गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपावर भाष्य करणारे एका वेगळ्या धाटणीच्या नाटकाचे प्रायोगिक रंगभूमीवरील पदार्पण लक्षवेधी होते. केवळ आणि केवळ गिरणी कामगारांना आर्थिक लाभ व्हावा, यासाठी दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली पुकारला गेलेला हरताळ, आज या नेत्याच्या थडग्यासह एकेकाळी कामगारांनी वसवलेल्या गिरणगावात पहायला मिळतो. राजकारण्यांनी पद्धतशीरपणे एका दुर्बळ मानवजाती विरोधात रचलेला कट ज्यांना त्यातील धगधगते वास्तव माहीत आहे, त्यांची विचारांची कुवत रक्त गोठल्यागत निःशब्द होते. अर्थात मी हे वेगळे सांगण्याची गरज नाही कारण याबाबत जयंत पवारांपासून ते अशोक राणे यांच्यापर्यंत अनेक सृजनांनी भाष्य करुन झाले आहे.
मध्यंतरी नारायण सुर्वेंच्या साहित्य निर्मितीच्या अानुषंगाने पार पडलेल्या एकदिवसीय संमेलनातही हा विषय चघळला गेला. तर माझा एक्सपेरीमेंट हा होता की, तोडी मिल फँटसी हे नाटक असल्याने या विभागातून नावारुपास आलेल्या दोन माध्यमांच्या दिग्दर्शकांना ही पत्रकार परिषद हजर राहायला लावून त्या संदर्भात त्यांच्या कानावर पडलेल्या प्रतिक्रियांबाबत चर्चा करायची. पैकी नाटक या माध्यमासाठी हेमंत भालेकर आणि चित्रपट माध्यमासाठी मनोहर सरवणकर हे या पत्रकार परिषदेस आवर्जून हजर राहिले. दोघांचीही जडणघडण याच गिरणगावात झालेली. संपाच्या जखमा त्यांच्या मनावर अगदी खोलवर झालेल्या आहेत. दोघांचेही अनुभव ऐकाल तर एक भयाण वास्तव आजही थरकाप उडवून देते. योगायोग म्हणावं की दुर्दैव, या संपाची पार्श्वभूमी असलेल्या जयंत पवारांच्या अधांतर या नाटकात हेमंत भालेकरांची भूमिका होती. तिचं बाब मनोहर सरवणकरांच्या बाबतीत सांगता येईल. मिलमध्ये कामाला असलेले वडील पगाराच्या दिवशी काही तरी खाऊ घेऊन येतील या आशेने मध्यरात्र जागवून काढणारे त्यांचे बालपण आणि मिल बंद पडल्यावर पोटासाठी स्वीकारायला लागलेली बाल मजुरीने रंगलेल्या काळ्या अध्यायाची पाने त्यांना उलटावीशी वाटतं नाहीत. दोघांनाही या वास्तवाचे प्रखर भान आहेच आणि त्यातून ते तोडी मिल फँटेसीकडे कसे पाहतात, हाच तो प्रयोग होता.
तोडी मिल फँटसीमध्ये वास्तवाचं मीठ थोडं कमी पडलंय. त्यामुळे फँटसी एन्जॉय करण्याच्या नादात प्रेक्षकांना वास्तवाचं भान येणार नाही, असं दोघांचही मत पडलं. प्रायोगिक नाटक म्हणून जरी आम्ही स्वीकारलं, तरी बॅक ऑफ द माईंड होत असलेल्या आमच्या वेंदनांचं हे पेन किलर ठरू शकत नाही. नव्या शतकात जन्मलेल्या नव्या पिढीच्या वाट्याला या दोघानांही आलेल्या अनुभवांच्या चटक्याना रंगभूमीवर मांडण्यासाठी असा कोणता दाहक फॉरमॅट या नाटकाने अंगीकारलाय? असा नकळत एक सवाल ते विचारतात. कारण हे नाटक यंग जनरेशनच्या म्युझिकल फॉरमॅटमधले आहे. ते खटकत नाही, पण ते त्या नाटकाचं बलस्थान असायला हवं, ते मात्र होत नाही. असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. या संपाबाबत अनेक स्टोऱ्या रंगवल्या गेल्या. उदाहरणार्थ या गिरणगावातल्या मुलींनी आर्थिक तडजोड म्हणून वेश्या व्यवसाय स्वीकारले. लालबाग-परळ सारख्या चित्रपटात दाखवली गेलेली त्या स्वरूपाची व्यक्तिरेखा ही प्रातिनिधिक स्वरुपाची कदापिही नव्हती, ती एका पीडित मुलीची सबस्टोरी होती. कुठूनही काहीच होत नाही असं आढळल्यावर केवळ आर्थिक दबावाखाली अनेक कुटुंबाची झालेली धुळधाण या नव्या पिढीला माहिती असेल, परंतु त्यांच्या भावनांचे काय? थोडक्यात हा फँटेसीत रमण्याचा विषय नाही. गिरणी कामगारांचा हा संप आजही संपलेला नाही तरीही त्याचे पडसाद राज्यकर्ते, मिल मालक आणि त्यांचे मध्यस्थी अशा अनेकांचे उखळ पांढरे करणारा ठरलाय. त्याजागी उभे राहिलेले मॉल्स, टॉवर्स, बिझनेस सेंटर्स हीच पीडितांच्या दष्टीने फँटेसी असेल पण ती विद्रूप असेल आणि असावीच या ठाम समजुतीने आम्ही हे नाटक पाहू शकतो, हे या दोघांचेही मत ठरले.
हेमंत भालेकरांनी तर एक भीती यानिमित्ताने अधोरेखित केली ती म्हणजे, ते ज्या काळी अधांतर करत होते त्याकाळी गिरणी कामगारांशी संबंधित असलेला प्रेक्षकवर्गच आमच्या नाटकाशी कनेक्ट होऊ शकला होता. बाकीच्या मुंबई-ठाणेकरांना या दाहकतेची सुतराम झळ सुद्धा लागलेली नव्हती, परिणामी मुंबई उपनगरातील व मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी हे नाटक नाकारलं. नाटकाला अनेक पुस्कार मिळाले. नाटकातला प्रत्येकाचे करिअर घडले, मात्र त्याला लोकाश्रय मिळाला नाही हे वास्तव होते. मग या फँटेसीशी प्रेक्षक रिलेट करतील? ही प्रश्नार्थक भीती अर्थातच निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर आणि अंकुश चौधरी या काहीतरी नवे करू पहाणाऱ्या निर्मात्यांबाबत होती. सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ही फँटसी मात्र नव्या पिढीला जखडून ठेवेल यात शंकाच नाही.
म्हणून मग माझ्या या प्रयोगाचे अनुमान असे की नव्या पिढीने नव्या पिढीसाठी व्यक्त केलेला हा इतिहास जर मानवतेच्या वाटचालीतील आर्थिक घटकाची क्रांती ठरत असेल, तर याकडे सकारात्मक भान ठेऊन सामोरे जावे लागेल, अन्यथा आयुष्यभर केवळ नैराश्यातच जगावे लागेल. या नाटकाचे सैद्धांतिक विवेचन आणि निरीक्षण या लेखाचा उत्तरार्ध असेल.