
'पोरांनो मला माफ करा, मी लताचा शेवट करतोय'
एक वेदनादायक प्रसंग, जो कोणा शत्रूलाही नकोसा वाटावा
नाशिक : जेल रोड परिसरात बुधवारी घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. ७८ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांनी पत्नीच्या दीर्घ आजाराला कंटाळून तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘पोरांनो मला माफ करा, मी लताचा शेवट करतोय’ असे शब्द त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वाचून सर्वांची मने सुन्न झाली आहेत.
ज्येष्ठ दाम्पत्याचा वेदनादायक अंत
मुरलीधर जोशी आणि त्यांच्या पत्नी लता (७६) गेली अनेक वर्षे जेलरोड येथे वास्तव्यास होते. लता जोशी गेली साडेतीन वर्षे अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत होत्या. मोलकरीण सीमा ही सकाळी काम करून गेल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास जोशी यांनी स्वतः सुसाईड नोट लिहून पत्नीचा गळा दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःला गळफास लावून जीवन संपवले.

मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक तरतूद आणि प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ...
सायंकाळी मोलकरीण परत आल्यानंतर घरातील भीषण दृश्य समोर आले. मुरलीधर जोशी गळफास घेतलेल्या अवस्थेत तर लता जोशी मृतावस्थेत पलंगावर आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सुसाईड नोटमध्ये जीवनातील हतबलतेचा सूर
जोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांच्या मनातील वेदना आणि ताण स्पष्ट दिसून येतो. 'मी लताचा शेवट करतोय', 'मी आनंदाने आत्महत्या करतोय', 'माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये' असे वाक्य त्यांच्या भावनिक तडफडीतून जन्मले आहेत. त्यांनी मोलकरीण सीमाचं आभार मानत तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या खात्यामधले ५०,००० रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच अंत्यविधीसाठी पैसे, सोनं वगैरे कुठे ठेवले आहेत, हेही स्पष्ट करून ठेवले आहे.
परिसरात हळहळ आणि खळबळ
जोशी यांची दोन्ही मुले, त्यापैकी एकजण नवी मुंबईत, तर एकजण मुंबईत राहत असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने मुरलीधर जोशी यांचे परिसरातील नागरिकांसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ही घटना मानसिक आरोग्य, वृद्धांची काळजी आणि समाजाच्या भावनिक आधार व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करते.
पोलीस तपास सुरू
उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मुरलीधर जोशी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
ही घटना केवळ एक बातमी नाही, तर आपल्या समाजातील दुर्लक्षित कोपऱ्यातील एक खोल जखम आहे. आज गावोगावी हिच परिस्थिती पहायला मिळते. मुलं काम-धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली असतात आणि घरातली वृद्ध मंडळी त्यांची वाट पहात बसलेली असतात. त्यामुळे वृद्धांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा, या सगळ्यांची पुन्हा एकदा गंभीरपणे दखल घेण्याची ही वेळ आहे.