मुंबई : मुंबई–मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी १०० ते ३०० रुपये तिकिट दर आकारले जात असताना आता गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर मात्र प्रवाशांकडून याच प्रवासासाठी एक हजार रुपये घेतले जात आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ही बाब उघडकीस आणली असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर प्रवासी व पर्यटकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाजपचे कुलाबा येथील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला (एमबीपीटी) पत्र पाठवून गेटवे येथील जेट्टी क्रमांक ५ वरील कामकाजाची, तसेच एमबीपीटी आणि मांडवा एलएलपी यांच्यामधील करारातील अटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्पीड बोट सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियावरून मांडवाला जाण्यासाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील इतर जेटीवरून त्याच प्रवासासाठी सुमारे १०० ते ३०० रुपये दर आकारतात. त्यामुळे हे तिकिट दर खूपच अवाजवी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच या जेट्टीवर तिकीट दर कुठेही पारदर्शकपणे जाहीर केलेले नाहीत. प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष जागेवरच तिकीट खरेदी करावे लागते, असाही आरोप पत्रात केला आहे.