
मुंबई : संतांच्या कीर्तनाचे वेड अवघ्या जगाला आहे. मोबाईलवर सतत सोशल मीडियाचा वापर करणारी तरुण मंडळी आपल्या आजूबाजूला वावरत असते. मात्र याला अपवादही आहे. कीर्तनासारख्या आख्यानामध्ये रमणारी तरुणमंडळी हातावर मोजण्याइतकीच आहे. १२ वर्षांची चिमुकली बंजारा भाषेत कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. हे ऐकून नवल वाटेल पण हे खरं आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।।
कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।।
आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।।
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।।
तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो व गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर राहतो अन्यथा नाही. आजवर प्रत्येकाने कीर्तन ऐकलं असेल मात्र बंजारी भाषेत कीर्तन हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार! च्या मंचावर सर्वात चिमुरड्या १२ वर्षीय ह.भ. प. यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शो च्या निमित्ताने महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहे. घरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे ह. भ. प. यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. या मंचावर ह.भ प. यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केला. संत नामदेवांचं कीर्तनही तिने यावेळी सादर केलं . गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह. भ. प. यशस्वीताई आडे हिचं वय. मात्र, ही चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहचावी यासाठी प्रयत्न करतेय.