Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखअमेरिका असंतोषानंतर ट्रम्प भूमिका बदलतील का?

अमेरिका असंतोषानंतर ट्रम्प भूमिका बदलतील का?

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफविरोधात आज अमेरिकेत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ट्रम्प यांच्याशिवाय एलॉन मस्क यांच्याविरोधातही घोषणा दिल्या. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा संताप आंदोलकांच्या घोषणांतून व्यक्त होत होता आणि ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या दरवाढीमुळे जगभरातील स्टॉक मार्केट आज अक्षरशः कोसळले. सकाळी सुरुवात झाल्यापासूनच बाजार कोसळण्याचे संकेत मिळाले आणि त्यातून ट्रम्प यांच्या मनमानी धोरणाची झलक पाहायला मिळाली होतीच. आजचे आंदोलन हे ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधातील सर्वात मोठे आंदोलन होते हे अनेकांनी नमूद केले आहे आणि हे आंदोलन ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे अमेरिकन लोकांच्या मनातील राग यानिमित्ताने दिसून आला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे केवळ जास्त कर द्यावे लागतात हा एकमेव मुद्दा नाही, तर हजारो लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार होणार आहेत. तसेच त्यांना निवृत्तीनंतर जे लाभ मिळत असतात त्यांना चांगलीच कात्री बसणार आहे. लोकांच्या मनातील राग हा आहे.

अमेरिकेत मध्यमवयीन तसेच वृद्ध नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या लाभांना तेथे अत्याधिक महत्त्व आहे. पण ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिकन नागरिकांना या लाभांवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आंदोलनातील लोकांचा राग जसा वाढत आहे तशीच त्यामागील उत्स्फूर्तता वाढत आहे. अर्थात ट्रम्प यांच्यावर याचा परिणाम होणार नाही, कारण त्यांनी असे म्हटले आहे की, काही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागतेच. अनेक जागतिक नेत्यांनी ट्रम्प यांच्याशी टॅरिफवर बोलणी केली आहेत आणि त्यात जपानचा समावेश आहे तसेच ब्रिटनचा समावेश आहे. पण ट्रम्प त्यांचे ऐकतील असे वाटत नाही, असे तज्ज्ञांना वाटते. ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात सर्वप्रथम नॅशनल मॉल येथे निदर्शने आयोजित केली गेली आणि ती लाट हळूहळू सर्व जगभर पसरत आहे. इतर अनेक शहरांमध्ये असेच गट आंदोलन करत आहेत आणि त्यांचा रोख आहे तो ट्रम्प यांच्यावर. ट्रम्प, मस्क आणि अनेक अब्जाधीश मिळून आम्हाला बरबाद करू पाहत आहेत असा त्यांचा आरोप आहे. त्याला ट्रम्प यांनी काहीही उत्तर दिले नाही. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जगाला हादरा बसला आहे तरीही भारतावर त्याचा सर्वात कमी परिणाम झाला आहे असे काहींचे म्हणणे आहे. त्याच्या टॅरिफमुळे जगभर शॉकवेव्हज निर्माण झाल्या आहेत हे निश्चित आहे; परंतु जागतिक बाजारपेठा मात्र धक्क्यात आणि गोंधळाच्या स्थितीत आहेत हे लपवून चालणार नाही. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मुक्त व्यापाराला धक्का बसला असला तरीही त्याचा धक्का अगदीच गंभीर जखमी करणारा नसेल असे काहींनी म्हटले आहे. पण अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे हे निश्चित. या टॅरिफ वॉरमुळे फ्री ट्रेडला धक्का बसला असला तरीही त्यामुळे मोठे गुंतवणूकदार खासगी इक्विटी विकून टाकण्याचा विचार करत आहेत, हे कोणत्याही बाजाराला धोकादायक आहे. सर्व जगभरात ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे लोक रस्त्यावर आले आहेत आणि त्यांना चिंता आहे ती आपल्या भवितव्याची.

जागतिक बाजारपेठांमध्ये ट्रम्प यांच्या शुल्कामुळे प्रचंड आर्थिक उलथापालथ झाली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना भीती किंवा भावनेने प्रेरित होऊन निर्णय न घेणे हीच आज सर्वात महत्त्वाची बाब बनली आहे. त्याला लोक कसे सामोरे जातात यावर ट्रम्प यांच्या या टॅरिफ योजनेचे यशापयश अवलंबून आहे. आर्थिक बाजारपेठ ही अनिश्चिततांनी भरलेली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी कसलाही आततायी निर्णय न घेता आलेली परिस्थिती स्वीकारून शांतपणे निर्णय घेणे ही आजची जबाबदारी आहे हे ओळखून लोकांनी वागायला हवे. ट्रम्प यांच्या व्यापार करामुळे मुंबई शेअर बाजारात उलथापालथ झाली आहे आणि तेथे शेअर्स कोसळले आहेत, त्यामुळे सेन्सेक्स २६०० अंकांनी कोसळला आणि ही मोठी पडझड आहे. निफ्टीचीही हवालदिल अवस्था झाली आहे आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांतील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा निर्णय एकट्या अमेरिकेपुरता मर्यादित नाही, तर सर्व जगाला त्याचा फटका बसला आहे. ही अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. यातून अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात मंदी ओढवणार आहे. या परिस्थितीमुळे जगाला १९२९ च्या जागतिक मंदीची आठवण आली, तर नवल नव्हे. त्यावेळी अमेरिकेत अशीच मंदी आली होती आणि त्यानंतर अमेरिका कोसळली होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते हर्बर्ट हूव्हर. त्यांच्या काळात स्टॉक मार्केट कोसळले होते आणि कित्येकांनी आत्महत्या केल्या होत्या. आज एवढी परिस्थिती नसली तरीही अमेरिका आजही तितकीच दयनीय स्थितीत आहे हे या लोकांच्या आंदोलनामुळे सिद्ध झाले आहे. आज अमेरिकन जनता रस्त्यावर आहे आणि त्याचे पडसाद सर्व जगभर उमटत आहेत. आज अमेरिकेत करण्यात आलेली निदर्शने ही सर्वात मोठी होती, असे आता सांगण्यात येत आहे. पण ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आणखी एक गंभीर परिणाम समोर आला आहे आणि तो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. त्यामुळे धोक्याचे संकेत मिळाले आहेत. त्यातून जग कसे सावरणार हे आता प्रत्येक देशावर अवलंबून आहे. उद्योगांमध्ये घसरण झाली आणि प्रत्युत्तराच्या धमक्या यांची एक लाट आली आहे. त्यामुळे जगभर एक प्रतिस्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि चीनने अमेरिकेवर गुंडगिरी केल्याचा आरोप केला, तर युरोपियन युनियनने अमेरिकेवर तसेच कर लावण्याची धमकी दिली आहे. व्यापार युद्ध आणि शुल्क युद्धामध्ये कुणीही विजेता नसतो असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, ते तंतोतंत सत्य आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी अमेरिकेला आपला टॅरिफ मागे घेण्याचे आवाहन केले आहे. अर्थात अमेरिका ते मानणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे या युद्धात फक्त जगच नव्हे तर अमेरिकाही होरपळणार आहे. पण ट्रम्प यांच्यासारख्या हट्टी नेत्याला हे सांगणार कोण अशी परिस्थिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -