Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसाप्ताहिकअर्थविश्व

Black Monday : शेअर बाजार घसरला, सिलेंडर महागला; पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढला

Black Monday : शेअर बाजार घसरला, सिलेंडर महागला; पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढला
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतासह जगातील अनेक देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर टॅरिफ लागू केला आहे. या निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८५ रुपये ८२ पैशांवर पोहोचला आहे. सेन्सेक्स २२२६.७९ अंकांनी घसरून ७३,१३७.९० आणि निफ्टी ७४२.८५ अंकांनी घसरून २२,१६१.६० वर पोहोचला. टॅरिफबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांनंतर अनेक देशांच्या शेअर बाजारांमध्ये घट झाली. पाठोपाठ भारतात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढवण्यात आला. तसेच भारतात घरगुती वापराचा एलपीजी सिलेंडर महाग झाला.



पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढला

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील प्रति लिटर अबकारी कर (एक्साईज ड्युटी) प्रत्येकी दोन रुपयांनी वाढवला आहे. या निर्णयामुळे मंगळवार ८ एप्रिलपासून पेट्रोलचे उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे उत्पादन शुल्क १० रुपये प्रति लिटर झाले आहे. अबकारी करात वाढ झाली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या ग्राहकांसाठीच्या विक्रीच्या दरात वाढ होणार आहे की हा भार तेल कंपन्या सोसणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही काळ आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होते. या काळात तेल कंपन्यांनी दरात कोणताही बदल केला नव्हता. यामुळे करवाढीचा भार कंपन्यांवर टाकला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे नेमके चित्र रात्रीपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



एलपीजी ५० रुपयांनी महागला

घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरला जाणारा एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागला आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलेंडर ५५३ रुपयांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेत नसलेल्यांसाठी आधी एलपीजी सिलेंडर ८०३ रुपयांत उपलब्ध होता. आता हा सिलेंडर ८५३ रुपयांत मिळणार आहे. ही दरवाढ मंगळवार ८ एप्रिलपासून लागू होणार आहे.



गॅसच्या दरात वाढ

दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये गॅसचा पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने गॅसच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर ठिकाणी ३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आयजीएल दिल्लीमध्ये सुमारे ७० टक्के गॅस विकते, तर उर्वरित ३० टक्के गॅस इतर कंपन्यांचा आहे.सीएनजीच्या किमतीत झालेल्या या वाढीनंतर आता दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.०९ रुपये झाली आहे आणि नोएडा-गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईत सीएनजी ७७ रुपये किलो दराने विकला जात आहे.

टॅरिफच्या निर्णयाचा शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम

टॅरिफबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांनंतर अनेक देशांच्या शेअर बाजारांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया मागितली असता, टॅम्प यांनी चकीत करणारी प्रतिक्रिया दिली. मला काहीही बिघडू द्यायचे नाही. पण काही वेळा आजारावर उपचार करण्यासाठी दिलेल्या औषधांचा सुरुवातीला प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते; असे ट्रम्प म्हणाले. जगभर फार्मा, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

अमेरिकेत डाऊ जोन्स १.८९ टक्के, एस अँड पी ५०० ५.९७ टक्के, नॅसडॅक ५.७३ टक्के घसरला. युरोपचे शेअर बाजार तीन ते चार टक्क्यांनी घसरले आहेत. जपानचा निक्केई ८.४९ टक्के, हाँगकाँगचा शेअर बाजार १५.२४ टक्के, तैवानचा शेअर बाजार १०.७४ टक्के आणि शांघायचा शेअर बाजार ७.९३ टक्क्यांनी घसरला आहे.

टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढेल. अमेरिकेसह जगभर मंदीची लाट येईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या या भीतीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
Comments
Add Comment