अहिल्यानगर : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रात्री गुप्त बैठक केली. या बैठकीमुळे कर्जत नगरपंचायतीत लवकरच सत्तांतर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्तांतर झाल्यास हा आमदार रोहित पवार यांच्यासाठीचा मोठा राजकीय धक्का असेल, अशी चर्चा आहे. बैठक झाल्याच्या वृत्ताला राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १२ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण १५ नगरसेवक आहेत. भाजपाचे कर्जत नगरपंचायतीत २ नगरसेवक आहेत. पण सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्यास चित्र बदलेल. सध्या कर्जत नगरपंचायतीत शरद पवार गटाच्या उषा राऊत नगरध्यक्ष आणि काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष आहेत. पण एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याची भूमिका घेत अनेक नगरसेवकांनी नारजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे. यामुळे राम शिंदे यांना साथ देऊन कामं मार्गी लावत विकास निधी मिळवायचा या विचारानेच मविआच्या नगरसेवकांनी शरद पवार गट आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाण्याची तयारी केली आहे.
भाजपाच्या स्थापना दिनी रविवारी प्रा.राम शिंदे म्हणाले की, ‘पूर्वी इतर पक्षातील नेते भाजपाला हिणवायचे, टोमणे मारायचे. आता हे टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसत आहेत. याचा अर्थ आपले विचार आता सर्वांना पटायला लागले आहेत. मात्र, पक्षाच्या विचारांना जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात लढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल’ असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.