Monday, May 5, 2025

किलबिलसाप्ताहिक

मोठ्या सुट्ट्यांचा सदुपयोग असा करा...

मोठ्या सुट्ट्यांचा सदुपयोग असा करा...

लहानशा गोष्टी मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर

द्यार्थी मित्रहो, रोजची शाळा व दैनंदिन कार्यक्रम यातच तुमचा सगळा दिवस जातो. याशिवाय आणखी कितीतरी गोष्टी तुम्ही करावयास हव्यात. पण त्याला वेळ कुठे आहे असे तुम्ही विचाराल. पण तुम्हाला मोकळे दिवस खूप असतात. प्रत्येक आठवड्याचा रविवार, अन्य सणावारांच्या सुट्ट्या, गणपती, दिवाळी, वार्षिक परीक्षा झाल्या दिवसापासून जून महिन्यापर्यंत सुमारे शंभर दिवस तुम्हाला शाळा नसते. मुलांनो, हे सुट्टीचे दिवस तुम्हाला कितीतरी चांगल्या गोष्टीसाठी वापरता येतील. काय करावे? या दिवसात खूप वाचन करा. गोष्टींची पुस्तके वाचा. शास्त्रीय पुस्तके वाचा. काय वाचले? याची नोंद ठेवा.

एखादा छंद जोपासा, चित्रे काढा, कविता करा, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम यांसारख्या खेळांचे शिक्षण घ्या. घरातली लहान सहान कामे बिन तक्रार करा. आपल्या घराची सफाई करा. घरची बाग असेल, तर बागेत काम करा. आपले अंथरूण-पांघरूण स्वतः उचला, नीट घड्या घाला, तिथल्या तिथे व्यवस्थित ठेवा. दिवाळी व उन्हाळी सुट्टीत आवडीच्या शिबिराला जा. खूप ओळखी होतात. नवीन पाहावयास, शिकावयास व ऐकावयास मिळते. बुजरेपणा जातो. चार लोकांत कसे बोलावे, त्यांच्याशी कसे वागावे हे समजते.

तुमचे हस्ताक्षर कसे आहे? खराब अवाचनीय हस्ताक्षर हा मोठा दोष आहे. सुवाच्य सुंदर, आकर्षक, वळणदार हस्ताक्षर हा माणसाचा अलंकार आहे. परीक्षेत त्याचा फार फायदा होतो. मोठेपणी अक्षर सुधारता येत नाही व वेळही मिळत नाही. लेखन सुंदर असून भागत नाही ते शुद्धही असले पाहिजे. भरभर शुद्ध सुंदर लिहावयाचा सराव करा. यामुळे सुट्टीचे दिवस फुकट जाणार नाही. गेलेला क्षण परत मिळविता येत नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल असतो हे लक्षात ठेवा.

Comments
Add Comment