राज ठाकरे यांचे आंदोलन थांबवण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापरासाठी सुरू असलेले मनसेचे आंदोलन तूर्तास थांबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या आवाहनानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन मराठीसाठी जाब विचारण्याचे आंदोलन सुरू केले होते.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून म्हटले आहे की, “आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयावर पुरेशी जनजागृती केली आहे.”
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल” असा इशारा दिला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “आम्हालाही कायदा हातात घ्यायची इच्छा नाही. पण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मराठीचा सन्मान करणे तुमचं काम नाही का?”
Ambernath Crime : कलिंगड विक्रीआड सुरु नवजात बाळांची विक्री; ‘असा’ आला धक्कादायक प्रकार उघडकीस
दरम्यान, आज सकाळी उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीस गेले होते. या बैठकीनंतरच हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर झाला.
उदय सामंत यांनी राज ठाकरे भेटीनंतर म्हटले की, ‘आज मराठीच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत. त्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन आलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा की, महाराष्ट्रात ज्या काही संस्था आहेत. बँका आहेत त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. किंवा तिथे ज्या काही गोष्टी घडतात. त्याचा प्रतिबंध कसा करायचा. त्या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत.
उदय सामंत म्हणाले, “राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर चर्चा केली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. बँकांमध्ये मराठी व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी समितीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.”
राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात आले आहेत. अनेक ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो, दादागिरी केली जाते. त्यावर काहीतरी कायदेशीर वलय असले पाहिजे. त्यामुळे राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्यांची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना..
सस्नेह जय महाराष्ट्र.
सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.
मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.
पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?
आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !