७ पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे जप्त
मुंबई : चित्रपट अभिनेता सलमान खानला अनेकदा धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) मुंबईतील उपद्रव (Mumbai Crime) अद्याप थांबलेला नाही. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अंधेरी परिसरातून लॉरेन्स गँगच्या ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ७ पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने शनिवारी ३० मार्च रोजी ही कारवाई केली. या गँगच्या निशाणावर एखादा सेलिब्रिटी असण्याची शक्यता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच वर्तवली आहे. विकास ठाकूर, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. (Mumbai Police)
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत लॉरेन्स बिश्नोई गँगचे काही मेंबर शस्त्रांसह आल्याची माहिती गुप्त हेरांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी लॉरेन्स गँगच्या सदस्यांना ताब्यात घेतले. या पाचही जणांची सध्या चौकशी सुरू असून त्यांचा शस्त्रे बाळगण्यामागील हेतू तपासला जात आहे, असे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काळवीट प्रकरणापासून अभिनेता सलमान खानला लॉरेन्स गँगकडून सतत धमक्या येत आहेत. अशा परिस्थितीत टोळीच्या ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आल्याने सलमान खानच्या सुरक्षेचा विषय नव्याने चर्चेत आला आहे.
विविध राज्यांतील आहेत शार्प शूटर
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची विकास ठाकूर उर्फ विकी, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता अशी नावे आहेत. हे सर्व राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातच सुमित कुमार आणि विकास हे हिस्ट्री शीटर असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. साधारण ८ महिन्यांपूर्वी पहाटे ५ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर ७.६ बोअरच्या बंदुकीतून ४ राऊंड फायर करण्यात आले. या हल्ल्यानंतर जानेवारीत सलमान खानच्या अपार्टमेंटची बाल्कनी बुलेटप्रूफ करण्यात आली. याशिवाय सर्वत्र हाय रिझोल्युशन कॅमेरेही लावण्यात लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.