Friday, July 4, 2025

कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस, शहापूर तालुक्यात गारपीट!

कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस, शहापूर तालुक्यात गारपीट!

मुंबई : अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत आधी धुळीचे वादळ आले. त्यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.


आधी सोसाट्याचा वारा, धूळ आणि काळोख झाला. त्यामुळे जोरदार पाऊस येणार असल्याने पादचारी, दुकानदार, भाजी बाजार यांमध्ये धावपळ उडाली, आणि तेवढ्यात पाऊस आला. वारा आणि पावसाच्या सरी पडल्यानंतर मात्र वातावरण शांत झाले.



शहापूर तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी


शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहेत. सध्या उकाड्याने हैराण झाले असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून, तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे.



अवकाळी पावसामुळे व्यापा-यांच्या मालाचे काही प्रमाणात नुकसान झाले. काही परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने पंचाईत झाली.


डोंबिवली शहरात दुपारी तीन वाजल्यापासून वादळी वारे सुटले होते. दरम्यान, हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता. बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊसाची सुरूवात झाली.


कल्याण शहरात दुपारी साडे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांची धांदल उडाली. काहींनी रेनकोट, छत्री घेऊन तर काहींनी भिजून या पावसाचा आनंद घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा