हैदराबाद : हैदराबाद आणि तेलंगणातील इतर भागांत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा दिला असला, तरी त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत हैदराबाद आणि परिसरात जोरदार पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे.
हैदराबादमधील काही भागांमध्ये पाणी तुंबल्याने रस्ते जलमय झाले असून, वाहने पाण्यात अडकलेली दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक गुडघाभर पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Fake Aadhaar Card: AIचा गैरवापर! ChatGPTवर बनवले नकली आधार कार्ड!
अतिवृष्टीची प्रमुख ठिकाणे
अलवाल, बंजारा हिल्स, बेगमपेट, ईसीआयएल क्रॉस रोड्स, हब्सीगुडा, जुबिली हिल्स, काप्रा, कारखाना, मसाब टँक, पॅराडाईज, पंजागुट्टा, सैनिकपुरी, तारनाका आणि त्रिमुलघेरी या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांचा मृत्यू आणि चारमिनारचे नुकसान
नागरकुरनूल जिल्ह्यात शेतात काम करत असताना वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. गजुला एराम्मा (वय ६०) आणि सैदम्मा (वय ४५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेम नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, हैदराबादच्या ऐतिहासिक चारमिनारच्या ईशान्य मिनारला पावसामुळे तडे गेले असल्याची माहिती सियासत डेलीने दिली आहे.
वाहतूक कोंडी आणि प्रशासनाची कारवाई
हैदराबाद वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, मलकापेट रेल्वे अंडरब्रिज येथे पाणी तुंबल्याने नालगोंडा क्रॉस रोड्स ते आझमपूरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
“अग्निशमन दल घटनास्थळी असून, पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,” असे वाहतूक पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.