पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता, प्रशासनाने उपचारापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
अडीच लाख रुपये देण्याची तयारी असतानाही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तनिषाची प्रकृती खालावली आणि जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती. मात्र, अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या… म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेले, तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचे मनोबल खचले. ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती, असा आरोप वाघ यांनी पोस्टच्या माध्यमातून केला आहे.