कोल्हेधव वाशियांचा घसा पडला कोरडा
मोखाडा : गाव पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतीना वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो.तरीदेखील गाव पाड्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.त्यामुळे अशा मानवनिर्मित पाणी टंचाईचे चटके गेल्या काही वर्षांपासून कोल्हेधव गावातील नागरिकांना सहन करावे लागत आहेत.
दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत नळ जोडण्याविरोधातील कारवाई सुरूच
सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसं राहतात येथील नागरिकांना इतर मुलभूत सुविधांची तर वानवा आहेच परंतु त्याही पेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे यासाठी मागील सात आठ वर्षांत वीस ते पंचवीस लाख रुपयांचा निधी हा केवळ पाणी टंचाई दुर करण्यासाठी खर्च केलेला असताना ही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.महत्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर चे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.परंतू टॅंकर ये जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी सूचना पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचारी यांनी बोलताना सांगितले आहे.मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते.परंतू लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.यामुळे शासनाची नियमावलीच लोकांच्या जीवांवर उठली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीकडून नवीन विहीर बांधणे,जुन्या विहीरीची दुरुस्ती करणे यासह सौरऊर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे अशा पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झालेला असताना ही पाणी टंचाई संपायला तयार नाही. त्यामुळे खर्च केलेला निधी नेमका जातो कुठे? याचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे.
ग्रामपंचायतकडून विहीरीची दुरुस्ती करून येत्या दोन तीन दिवसांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली जाईल. – जी. लष्करी, ग्रामपंचायत अधिकारी आसे