मुंबई : लोकसभेत वक्फ विधेयक बुधवार २ एप्रिल रोजी सादर होणार आहे. हे जाहीर होताच महाराष्ट्रात राजकीय वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. तर भाजपाने लोकसभेतील पक्षाच्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे.
वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत !
बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?#WaqfAmendmentBill— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 1, 2025
वक्फ सुधारणा विधेयक उद्या म्हणजेच बुधवारी संसदेत येणार आहे. बघुया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार, या शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
Waqf Bill : भाजपाचे सर्व खासदार हजर व्हा, वक्फ विधेयकासाठी व्हिप जारी
वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत सादर होणार
संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी वक्फ विधेयक लोकसभेत सादर केले होते. त्यावेळी विधेयक लोकसभेतून एकमताने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशी आणि सूचनांच्याआधारे वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत सादर होणार आहे.
लोकसभेत रालोआची बाजू भक्कम
भाजपाने व्हिप काढला आहे. रालोआतील इतर घटक पक्षांकडूनही व्हिप काढले जाण्याची शक्यता आहे. तेलगू देसम पक्षाने विधेयकाचे समर्थन करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेत सध्या ५४२ खासदार आहेत. यात भाजपाचे २४० खासदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए अर्थात रालोआचे एकूण खासदार २९३ आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी २७२ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे लोकसभेत रालोआची बाजू भक्कम दिसत आहे. लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार आहेत. इंडी आघाडीचे एकूण खासदार २३३ आहेत. या व्यतिरिक्त काही लहान पक्षांचे खासदार आणि निवडक अपक्ष खासदार आहेत. पण या मंडळींनी वक्फ विधेयकाला विरोध करणार की पाठिंबा देणार हे जाहीर केलेले नाही. ही आकडेवारी बघता लोकसभेत विरोधकांची बाजू कमकुवत आहे.