
जिलेबी विक्रेत्यासह दोघे ‘डिजिटल अटक’ घोटाळ्यात अटकेत
मुंबई : ‘डिजिटल अटक’च्या (digital arrest) नावाखाली गृहिणीची जवळपास १० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एक जण जिलेबी विक्रेता आहे. पोलिसांनी आरोपींकडून १३ बँक पासबुक, चेकबुक आणि १७ डेबिट तसेच क्रेडिट कार्ड जप्त केली आहेत.
तक्रारदार महिला ५९ वर्षांची असून ती कांदिवली पश्चिम येथे राहते. १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तिला व्हॉट्सॲप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले आणि तिच्या बँक खात्याचा एका घोटाळ्यात वापर झाल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे खाते गोठवले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

ॲप-आधारित कॅब चालकावर बलात्कार आणि १० लाख खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल मुंबई : एका ४१ वर्षीय महिलेशी मैत्री करून वारंवार बलात्कार आणि १० लाखांची खंडणी ...
त्यानंतर एका बनावट वकिलाने देखील महिलेचा विश्वास संपादन करून तिला ‘डिजिटल अटक’ झाल्याचे सांगितले. १५ ते १८ जानेवारीदरम्यान आरोपींनी तिच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवले आणि तिला तब्बल ९.७५ लाख आरटीजीएसद्वारे पाठवण्यास भाग पाडले. काही दिवसांनी तिने नातेवाईकांशी बोलल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
यानंतर तिने मुंबई पोलिसांना ई-मेलद्वारे तक्रार दिली, त्यावर चारकोप पोलीस ठाण्यात ३१ जानेवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.
पोलिसांनी चौकशी केली असता, संपूर्ण रक्कम पुण्यातील २३ वर्षीय जिलेबी विक्रेता भग्गाराम देवासी याच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे आढळले. त्याचा मोबाईल नंबर बंद होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या दुसऱ्या नंबरचा शोध घेतला आणि तो पुण्यातील तळवडे येथे कार्यरत असल्याचे आढळले. चारकोप पोलिसांच्या पथकाने त्वरित पुण्यात धाव घेत देवासीला ताब्यात घेतले.
चौकशीत देवासीने कबूल केले की, त्याने पुण्यातीलच २४ वर्षीय कमलेश चौधरीच्या सांगण्यावरून बँक खाते उघडले होते. यासाठी त्याला ३०,००० रुपये कमिशन मिळाले होते.
पोलिसांनी चौधरीलाही शोधून अटक केली. चौकशीत चौधरीने सात ते आठ वेगवेगळी बँक खाती उघडून फसवणुकीचे पैसे स्वीकारल्याचे उघड झाले. हे पैसे तो टोळीप्रमुखाकडे ट्रान्सफर करीत होता.
सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे.