लोणावळा : मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन एसी कंटेनरमधून एकूण ५७ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बेकायदा गोमांस विक्री आणि वाहतूक करणे तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक करणे हे आरोप ठेवून एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
Raj Thackeray : औरंगजेबाला मराठ्यांनीच गाडले असा फलक कबरीजवळ लावावा!
हैदराबाद, तेलंगण येथून सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणात मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी (रा. हैदराबाद, तेलंगण), कंटेनरचालक नदीम कलीम अहमद आणि नसीर महंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांनी दोन्ही कंटेनरमधील प्रत्येकी दहा असे एकूण २० बॉक्स तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.